24 हजारांची लाच भोवली : वैध मापन विभागाचा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of ₹24,000 Proves Costly: Legal Metrology Inspector Caught in ACB Net भुसावळ (28 एप्रिल 2026) : पेट्रोल पंपाचे निरीक्षण करून प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 24 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना दिंडोरी (नाशिक) वैध मापन विभागाचा निरीक्षक नाशिक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. भगवान प्रल्हाद डोलारे असे अटकेतील लाचखोर अधिकार्याचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, वैध मापनशास्त्र विभागातील निरीक्षक भगवान डोल्हारे यांनी पेट्रोल पंपाच्या वार्षिक तपासणीसाठी प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितली होती. संबंधित पेट्रोल पंप मालकाकडून प्रत्येक नोजलसाठी 6,000 रुपये, अशी एकूण 24 हजारांची लाच मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार अधिकार्याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, हवालदार विनोद चौधरी, अनिल गांगोडे आदींनी हा सापळा यशस्वी केला.
लाचखोरांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी, जेणेकरून अशा भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करता येईल.
