भुसावळात अग्नितांडव : काझी प्लॉटमधील सहा घरांची राखरांगोळी
संसार उघड्यावर : अंत्ययात्रेला गेल्याने सुदैवाने बचावले नागरिकांचे प्राण
Inferno in Bhusawal: Six Houses in Kazi Plot Reduced to Ashes भुसावळ (2 मे 2026) : शहरात शुक्रवार, 1 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास काझी प्लॉट-पापा नगर परिसरातील एकमेकांना लागून असलेल्या सहा घरांना अचानक आग लागली. पाहता-पाहता क्षणार्धात आगीच्या ज्वालांनी नजीकच्या घरांनाही टार्गेेट केल्याने संसारोपयोगी वस्तूंसह लाखोंचे नुकसान झाले. या आगीत चार बकर्यांचा होरपळून मृत्यू झाला तर सुदैवाने या घरांमधील रहिवासी अंत्ययात्रेला गेल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही. कुटूंब उघड्यावर आल्याने प्रशासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
दुचाकींचेही नुकसान
आगीमुळे सहा घरातील संसारोपयोगी साहित्यासह दोन दुचाकीही जळाल्या तर बागीच्या ज्वाळांनी शेजारील इमारतीच्या एसी यंत्रणेलाही कवेत घेत नुकसान केले. सुदैवाने सहा घरांतील सुमारे 33 जण त्यावेळी जाम मोहल्ला परिसरात एका अंत्ययात्रेसाठी गेले होते अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. आयुष्यभराची कमाई आगीत राख झाल्याने कुटूंबियांनी मोठा आक्रोश केला.

चार बंबांनी मिळवले आगीवर नियंत्रण
पालिकेच्या चार अग्निशमन बंब व प्रेशर टँकरच्या साहाय्याने जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. अग्निशमन अधिकारी प्रशांत भोळे यांच्या नेतृत्वाखाली रवींद्र पाटील, दिनेश पुरोहित, विजय मनोरे, प्रवीण मिठे, मयूर भोई, अक्षय शिंदे, नितेश रायपुरकर, अनिल पवार, कुणाल परदेशी, पंकज डाके आदींनी धाडसाने कामगिरी बजावली., स्थानिक नागरिकांनीही तत्परता दाखवत बचावकार्याला मदत केली. काहींनी घरातील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी अग्निशमन दलाला सहकार्य केले. त्यामुळे आग आणखी पसरू न देता मोठा अनर्थ टळला.
या कुटूंबियांचे झाले नुकसान
या आगीत बाधित झालेल्या कुटुंबांमध्ये शेख मुनाफ, शेख वसीम, शेख सलीम, शेख शरीफ, शहा सलीम, युनूस खाटीक, शेख इसाक, शेख बशीर आदींचा समावेश आहे. त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंची अक्षरशः राखरांगोळी झाली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.