चाळीसगावातील तरुणीला ब्लॅकमेल करीत लूटले : आरोपीला बेड्या
आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ ; पोलिसांकडून कसून तपास सुरू
Young Woman from Chalisgaon Blackmailed and Robbed: Accused Arrested चाळीसगाव (5 मे 2026) : शहरातील 24 वर्षीय तरुणीला ब्लॅकमेल करत तिची आर्थिक लूट आणि विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार शहरात घडला आहे. चाळीसगाव शहर पोलिसांनी तत्परता दाखवत संशयित आरोपी यश महेंद्र जैन याला अटक केली असून त्याच्याविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले असून त्याने आणखी कुणा-कुणाची फसवणूक केली ? याचा तपास यंत्रणेकडून सुरू आहे.
असे आहे प्रकरण
24 वर्षीय पीडित तरुणीची आरोपी यश जैन याच्याशी जुनी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेशी मैत्री प्रस्थापित केली मात्र ही मैत्री केवळ एक जाळे निघाली. आरोपीने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर बोलत असताना पीडितेची संमती नसताना तिचे खासगी क्षण रेकॉर्ड केले. यानंतर आरोपीने आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली.


आरोपीने हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली. नकार दिल्यावर त्याने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाणही केली. बदनामीच्या भीतीने हतबल झालेल्या पीडितेकडून आरोपीने वेळोवेळी एकूण आठ लाख 12 हजार रुपये (फोन-पे आणि रोख स्वरूपात) उकळले. एवढेच नव्हे तर तिच्याकडून 90 ग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि कॉइन्स देखील बळजबरीने हस्तगत केले. अखेर या छळाला कंटाळून तरुणीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी यश जैनला अटक करण्यात आली.
आरोपी कोठडीत : मोबाईल डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी आरोपी यश जैन याला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीने याआधी मुलींना अशाच प्रकारे जाळ्यात ओढले का? याचा तपास सुरू असून मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती आहे.