भुसावळात अल्पवयीन मुलीचा विवाह ; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा
Marriage of a Minor Girl in Bhusawal ; Case Registered Against Five Individuals, Including the Husband भुसावळ (6 मे 2026) : भुसावळ शहरातील तेली समाज मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्यात आला. या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या पालकांसह पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
तक्रारीअंती पाच जणांविरोधात गुन्हा
30 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12 वाजता चाईल्ड हेल्पलाईन (1098) वर अज्ञात व्यक्तीकडून भुसावळातील तेली समाज मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने तत्काळ दखल घेत संबंधित पथकाला घटनास्थळी पाठविले.


दरम्यान, पथक दुपारी सुमारे 1.40 वाजता मंगल कार्यालयात पोहोचले असता विवाह विधी पूर्ण झालेला आढळून आला. यावेळी मुलगी व मुलाच्या वडिलांकडे जन्मतारखेचा पुरावा मागविण्यात आलामात्र तो तत्काळ सादर करण्यात आला नाही.
1 मे 2026 रोजी बालकल्याण समिती, जळगाव येथे मुलीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत सादर करण्यात आली. त्याच्या पडताळणीत मुलीचे वय विवाहाच्या दिवशी 17 वर्षे 8 महिने असल्याचे निष्पन्न झाले.
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देऊन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भुसावळातील तरुणासह पाच जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 मधील कलम 9, 10 व 11 अन्वये बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जुबेर तडवी करीत आहेत.