नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरण : मुख्य आरोपी निदा खानला अखेर बेड्या
Nashik TCS Conversion Case: Main Accused Nida Khan Finally Arrested नाशिक (8 मे 2026) : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना, यातील मुख्य आरोपी निदा खान हिला अटक करण्यात यंत्रणेला गुरुवारी यश आले. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने तिची 11 मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.
पोलिसांना चकवा मात्र अखेर जाळ्यात
निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त सापळा रचून तिला गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता अटक केली. ती महिला असल्याने सूर्यास्तानंतर अटकेबाबत असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करत, तिला प्रथम स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर नाशिकला आणले गेले.


धर्मांतर आणि प्रशिक्षण
यासंदर्भात माहिती देताना वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. त्यात पोलिसांचे म्हणणे होते की, हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या गुन्ह्याला वेगवेगळे अँगल्स आहेत. या प्रकरणात एका पीडितेला धर्मांतर करण्याच्या उद्देशाने भीती आणि धाक दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. पीडितेला बुरखा देण्यात आला असून, नमाज, हिजाब याबाबत ट्रेनिंग देण्यात आले. या प्रकरणात आरोपीची काय भूमिका आहे? तिच्याशिवाय या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे.
निदा खान गर्भवती, तिला आईला भेटण्याची परवानगी
आरोपी निदा खान ही गरोदर असल्यामुळे तिने आईला भेटण्याची परवानगी मागितली होती. त्यास आम्ही हरकत घेतलेली नाही. कोर्टाने आरोपीला दिवसातून दोन वेळा आईला भेटणे किंवा गरजेप्रमाणे औषध देण्याबाबत निर्देश केले आहेत, ते निर्देश पूर्णपणे पाळली जातील, असेही वकिलांनी सांगितले.
पीडितेच्या मोबाईलमध्ये चिथावणीखोर रील्स आणि लिंक्स
वकिलांनी सांगितले की, पीडितेच्या मोबाईमध्ये काही इन्स्टाग्राम, युट्यूब लिंक्स, काही रील्स टाकण्यात आलेले होते. या लिंक्स आणि रील्स चिथावणीकारक होते. त्याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे. हाही मुद्दा कोर्टासमोर मांडण्यात आला. तपासात असेही समोर आलेले की, या आरोपीने पीडितेच्या नमाज, बुरखा याबद्दल काही कार्यवाही केलेली आहे का? याबद्दल सखोल तपास करणे आवश्यक आहे. पीडितेचे नाव हनिया ठेवण्यात आलेले होते. या नावाचे काही कागदपत्रे मिळालेली आहेत.
मलेशिया कनेक्शन आणि नवा आरोपी
वकिलांनी सांगितले की, पीडित महिलेला मलेशियामध्ये इमरान नावाच्या व्यक्तीमार्फत जॉब देऊन पुढे पाठवण्याचा विचार होता. त्यात काही मनिट्रेल आहे का? यात मालेगावची पार्टी कोण आहे? मनिट्रेल काय आहे? याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे. तपासात माजीद पटेल हे नाव नव्याने समोर आलेले आहे. महिला आरोपी छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव भागात राहिलेली आहे. तिला कुणी आश्रय दिला? त्याबाबत तपास चालू आहे. यामध्ये माजिद पटेल नाव आलेले आहे. त्यालाही आरोपीमध्ये सामील करून, कलम 238 वाढ करण्यात आलेली आहे. हा सगळा तपास विचारात घेऊन आरोपी निदा खाल हिला न्यायालयाने 11 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
