80 लाखांच्या बिल मंजुरीसाठी 15 लाखांची लाच ; पहिल्या हप्त्याचे पाच लाख स्वीकारताच जळगावात सा.बां.विभागातील अभियंता एसीबीच्या जाळ्यात
₹15 Lakh Bribe Demanded to Clear ₹80 Lakh Bill; PWD Engineer in Jalgaon Caught in ACB Trap Immediately After Accepting First Installment of ₹5 Lakhs जळगाव (10 मे 2026) : लाचखोरीत अव्वल असलेल्या जळगावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बड्या1 अधिकार्याला 15 लाखांची लाच मागणी करून पहिल्या हप्त्यापोटी पाच लाखांची लाच स्वीकारताना जळगाव एसीबीने अटक केली आहे. या कारवाईने जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील सा.बां.विभागातील लाचखोर हादरले आहेत. योगेश अभिमन्यू अहिरे असे अटकेतील लाचखोर अधिकार्याचे नाव असून तो जळगाव सा.बां.विभागात वर्ग दोनचा शाखा अभियंता आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदार असून त्यांनी वॉर्ड 14 मधील विठोबा नगरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम केले आहे व या कामासाठी 80 लाख 39 हजार 472 रुपयांचे टेंडर 2024 मध्ये मंजूर झाले होते मात्र निधी उपलब्ध नसल्याने केवळ 42 लाख रुपये ऑक्टोबर 2025 मध्ये प्राप्त झाले.


15 लाखात तडजोड : पाच लाखांचा पहिला जप्त
तक्रारदाराने उर्वरित 38 लाख 49 हजार 742 रुपयांचे बिल निघण्यासाठी अभियंता अहिरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी बिल मंजुरीसाठी 18 लाखांची लाच मागितली व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 5 रोजी पडताळणी करण्यात आली.
कारमध्ये रक्कम ठेवताच अभियंता जाळ्यात
एसीबीने शनिवारी सापळा रचल्यानंतर आरोपी अहिरे याने त्याचे बलेनो वाहन (एम.एच.19 सी.व्ही.2619) च्या समोरील सीटखाली पाच लाखांची लाच रक्कम ठेवण्यास सांगितली व आरोपीने रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या.
अनेकांची होणार चौकशी
लाच प्रकरणात बडा मासा एसीबीच्या गळाला लागल्यानंतर भ्रष्टाचारी अधिकारी हादरले आहेत. यापूर्वीही विभागातील विविध कामांमध्ये गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप होत आले असून आता अधिकारीच जाळ्यात अडकल्याने या प्रकरणाशी संबंधित अनेकांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उअपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात निरीक्षक रेशमा अवतारे व निरीक्षक हेमंत नागरे, सुरेश पाटील, संगीता पवार, बाळू मराठे, प्रदीप पोळ, भूषण पाटील आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
