यावल शहरात फोटोग्राफरची कार अडवत मारहाण : साहित्यही लांबवले
Photographer’s Car Stopped and He Was Assaulted in Yawal City ; Equipment Also Stolen यावल (14 मे 2026) : शहरातून जाणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय ते बुरूज चौक दरम्यान बुधवारी रात्री चारचाकी वाहन घेऊन जात असलेल्या फोटोग्राफरला शाईन दुचाकी घेऊन आलेल्या दोघांनी अडवत वाद घातला. यावेळी अनोळखी 20 लोकांचा जमाव जमल्यानंतर कारमधील 21 वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली त्याचे फोटोग्राफीचे साहित्य तेथून लांबवण्यात आले. यावेळी कारच्या पुढील दरवाज्याला तोडून तसेच समोरील काच फोडण्यात आले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे नेमके प्रकरण ?
शहरातून मार्गस्थ होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राष्ट्रीय महा मार्गावर चोपडा शहराकडे जाणार्या रस्त्यावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे. तेथून ते बुरूज चौकादरम्यान एचपी पेट्रोल पंपाच्या रोडवर अनिकेत नंदा जाधव (21, रा.मिलिंद नगर, जामखेड, जि.अहिल्यानगर) हा फोटोग्राफर चारचाकी वाहन (क्रमांक एम.एच.04 ई.एक्स. 0811) व्दारे चोपड्याकडून यावल शहरात येत असताना रस्त्यावर शाईन काळ्या रंगाच्या लाल काळेपट्टे असलेल्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसमांनी त्याला थांबवले आणि त्याच्याशी वाद घातला. यावेळी 15 ते 20 जणांचा जमाव देखील चालून आला. यावेळी तरुणाला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच चारचाकी वाहनातील पुढील काच दगडाने फोडून, उजव्या दरवाज्याचे काच तोडून नुकसान करण्यात आले व फोटोग्राफीचे कॅमेरे व बॅग हे साहित्य देखील तेथून लांबवण्यात आले.








