जळगावात गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या वादातून तरुणाच्या दिशेने गोळीबार : भुसावळातील संशयीतासह तिघांना अटक
तलवार व धारदार शस्त्रांनी दशहत निर्माण केल्याचा आरोप : हल्ल्याचा प्रयत्न : पाच जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : शहरातील शिवाजीनगर परिसरात गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या रागातून
एका तरुणाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने गोळीबार करीत तलवारी काढून दशहत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे.ही धक्कादायक घटना जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत 17 रोजी सायंकाळी सात ते सव्वासात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भुसावळ शहरातील एकासह जळगावातील दोघांना अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केल्याचा राग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेखा कैलास पंचोरे (वय 50, रा. घर क्रमांक 278, प्रभात मेडिकलसमोर, शिवाजीनगर, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, सीमा शर्मा व प्रेम पाटील यांच्यात झालेल्या वादासंदर्भात सीमा शर्मा यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणात फिर्यादीचा मुलगा केयूर पंधारे याने गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केल्याच्या कारणावरून आरोपींच्या मनात राग होता. याच रागातून भुवनेश आबा बाविस्कर, पंढरी सपकाळे, भैय्या सोनवणे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीच्या घराबाहेर येऊन त्यांच्या मुलगा केयूरला शिवीगाळ केली तसेच त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी भुवनेश बाविस्कर याने कमरेला लावलेली बंदूक काढून फिर्यादीच्या दिशेने गोळी झाडली तसेच काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेल्या एका इसमाने हातातील तलवार व इतर धारदार शस्त्रांनी दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (इछड) तसेच भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत खुनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकार्यांची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तीन आरोपींना अटक
शहर पोलिसांनी जितेश मगन कोळी (38, कोळीवाडा, आवारा इदगाव, ता.जळगाव), हर्षल जितेंद्र कदम (28, श्रीराम नगर, वांजोळा रोड, भुसावळ) व पंढरी बाबूलाल कोळी (33, भोलाणे, ता.जळगाव) यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सावित्री ढगे करीत आहेत.
