रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने नगरदेवळ्यातील तरुणाची 40 हजारात फसवणूक

पाचोरा पोलिसांत येवदा येथील महिलेविरोधात गुन्हा दाखल


नगरदेवळा. ता.पाचोरा (गुरुवार, 19 नोव्हेंबर 2026) : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत नगरदेवळा, ता.पाचोरा येथील 35 वर्षीय तरुणाची 40 हजार रुपयात आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित अरुणा धनंजय गावडे (येवदा, ता.दर्गापूर, जि.अमरावती) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
महेश दत्तात्रय पाटील (35, व्यवसाय शेती, रा. भामरेगल्ली, नगरदेवळा, ता. पाचोरा, जि. जळगाव) यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत अरुणा गावडे यांनी रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व या आमिषाला ते बळी पडले. त्यांनी टप्प्याटप्प्याने नगरदेवळा येथील इंडियन पोस्ट पेमेंट बँक तसेच फोन-पेच्या माध्यमातून एकूण चार लाख रुपये संबंधित संशयीता दिले.

महिलेविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा
वारंवार नोकरीबाबत विचारणा केल्यानंतर महिलेने तीन लाख 60 हजार रुपये परत केले मात्र उर्वरित 40 हजार रुपये परत न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाचोरा पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून अरुणा धनंजय गावडे (रा.येवदा, ता.दर्गापूर, जि.अमरावती) विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय निवृत्ती दशरथ मोरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !