इंधन दरवाढीचा भडका : पेट्रोलसह डिझेल प्रत्येकी तीन रुपये लिटरने महागले
Fuel Price Surge: Petrol and Diesel Each Become ₹3 Per Liter More Expensive नवी दिल्ली (15 मे 2026) : महागाईने जनता होरपळली असतानाच आता त्यात इंधन दराच्या उडालेल्या भडक्याने भर घातली आहे. देशात पेट्रोलसह डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये तर डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. नवीन दर शुक्रवार, 15 मे पासून लागू करण्यात आले असून सुमारे दोन वर्षांनी इंधन दर वाढले आहेत.
दर वाढीला युद्धरची किनार
या वाढीचे मुख्य कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उतार आहे. इराण आणि अमेरिकेतील युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूड ऑइलचे दर 70 डॉलर होते, जे आता वाढून 100 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. क्रूडच्या किमती वाढल्याने तेल कंपन्या दबावाखाली असल्याने कंपन्यांनी तोट्याची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. जर कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये दीर्घकाळ वाढ कायम राहिली, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढवल्या जाऊ शकतात.
2024 पासून दर बदलले नव्हते
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मार्च 2024 पासून स्थिर होत्या. लोकसभा निवडणूक 2024 च्या अगदी आधी सरकारने किमतींमध्ये 2 प्रति लिटरने कपात करून जनतेला दिलासा दिला होता. तथापि, तांत्रिकदृष्ट्या भारतात इंधनाच्या किमती नियंत्रित आहेत आणि कंपन्या आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या 15 दिवसांच्या सरासरी किमतीच्या आधारावर दररोज दर बदलू शकतात, परंतु राजकीय संवेदनशीलतेमुळे त्या दीर्घकाळ बदलल्या गेल्या नाहीत.
सरकारच्या मते, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तोट्यात चालल्या होत्या.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉइंट सेक्रेटरी सुजाता शर्मा यांच्या मते, कंपन्यांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या विक्रीवर दरमहा सुमारे 30 हजार कोटींचे नुकसान होत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले होते, इंधनाचा वापर कमी करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तेलंगणामध्ये एका कार्यक्रमादरम्यान पश्चिम आशियातील भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन पेट्रोलियम उत्पादनांचा काळजीपूर्वक वापर करण्याचा सल्ला दिला होता.
पंतप्रधानांनी म्हटले होते की, आज काळाची गरज आहे की पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर अत्यंत संयमाने केला जावा. आपण आयात केलेल्या पेट्रो उत्पादनांचा वापर केवळ गरजेनुसारच केला पाहिजे. यामुळे केवळ परकीय चलनच वाचणार नाही, तर युद्धाचे प्रतिकूल परिणामही कमी होतील.



