भुसावळातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचा अपघाती मृत्यू
भुसावळ (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : भुसावळ पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याचा पिकअप चारचाकी वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश आनंदराव पाचपांडे (67, नाहाटा कॉलेजजवळ, पियुष कॉलनी, भुसावळ) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. सेवानिवृत्त कर्मचार्याच्या अकाली मृत्यूने पोलीस वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात आली.
घराकडे येत असताना वाहनाची धडक
सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश पाचपांडे हे 1 ऑक्टोबर रोजी दुचाकीने राजस्थान मार्बलकडून आपल्या घराकडे निघाले असताना पिकअप चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने पाचपांडे हे जखमी झाले. स्थानिक बाजारपेठ व वाहतूक शाखेला अपघाताची माहिती मिळताच सहा.निरीक्षक राहुल भंडारे व सहकार्यांनी धाव घेत अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसात जमा केली तर जखमी पाचपांडे यांच्यावर शहरातील विघ्नहर्ता रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची 4 रोजी पहाटे 3.45 वाजता प्राणज्योत मालवली. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय जगन सोनवणे करीत आहेत.
शांतीदूत संघटनेकडून 20 हजारांची मदत
मयत पाचपांडे यांनी शहर, बाजारपेठ पोलीस ठाण्यासह विविध ठाण्यात सेवा बजावली होती शिवाय नेहमीच इतरांच्या कामी ते धावून जात असल्याने पोलीस वर्तुळात त्यांच्याविषयी आदराची भावना होती. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस दलातूनही हळहळ व्यक्त झाली. पाचपांडे हे जळगाव निवृत्त पोलीस संघटना (अमरदीप योजना) चे सभासद असल्याने त्यांच्या खात्यावर तातडीचे 20 हजारांचे सानुग्रह अनुदान अदा करण्यात आले.


