शासकीय नोकरी लावून देण्याच्या आमिषाने जळगावच्या तरुणाला 55 लाखांचा गंडा : अकोल्याच्या त्रिकूटाविरोधात गुन्हा
Jalgaon Youth Swindled Out of ₹55 Lakhs on Pretext of Securing Government Job: Case Registered Against Trio from Akola जळगाव (18 मे 2026) : शासनाच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने तरुणाची 55 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली.
असे आहे प्रकरण
जळगावच्या नेताजी चौक, मेहरुण परिसरातील कुणाल रविंद्र नाईक (39) यांनी फिर्याद दिल्यानुसार संशयीत स्वाती जुनागडे उर्फ स्वाती इंगळे (रा.आंबेडकर चौक, शिवणी अकोला), स्वप्नील राजेंद्र जयस्वाल व अमित राजेंद्र जयस्वाल यांनी 2019 पासून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शासनाच्या विविध खात्यांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपींनी बनावट नियुक्ती आदेश तसेच खोटे ओळखपत्र तयार करून दिले.
या माध्यमातून फिर्यादी, त्यांचा भाऊ चेतन नाईक तसेच निखील नाईक यांच्याकडून तब्बल 55 लाख 50 हजार रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे. आरोपींनी शासनातील अधिकारी व विविध विभागांशी संबंध असल्याचा बनाव करून विश्वास संपादन केला होता. मात्र प्रत्यक्षात कोणतीही नोकरी न देता आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ तपास करीत आहेत.










