जळगावनंतर भुसावळात आढळली बांग्लादेशी घुसखोर महिला : बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Following Jalgaon, a Bangladeshi female infiltrator found in Bhusawal; Market Police take her into custody भुसावळ (20 मे 2026) : सोशल मिडीयातून बहरलेल्या प्रेमातून बांग्लादेशी प्रेयसी थेट जळगावात पोहोचली होती मात्र पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी प्रेयसी व प्रियकराला बेड्या ठोकल्या होत्या. जळगावात झालेल्या या कारवाईनंतर भुसावळातही बांग्लादेशी महिलेचे वास्तव्य आढळले असून बाजारपेठ पोलिसांनी माहितीअंती कारवाई केली आहे. फरीदा बेगम मोहम्मद खान (42, रा.भीमकाठी, उपजिल्हा नाझीरपूर, जिल्हा पीरोजपुर, बांगलादेश) असे अटकेतील महिलेचे मूळ नाव असलेतरी तिने भारतात आल्यानंतर खोट्या पुराव्यांद्वारे जस्मीन बी.मोहम्मद खान (दीनदयाल नगर, भुसावळ) असे नाव धारण केल्याचे समोर आले आहे.
बांग्लादेशी असल्याचे पुरावे प्राप्त
पोलिसांनी आरोपी महिलेकडून मोबाईल जप्त केला असून मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणात व्हॉटसअॅप कॉलवरून बांगलादेशी कंट्री कोड (+880) असलेल्या क्रमांकांशी सातत्याने संपर्क, चॅटिंग व व्हिडिओ कॉल्स झाल्याचे पुरावे प्राप्त झाल्याची माहिती असून मोबाईलमध्ये आरोपीच्या जन्मदाखल्याची प्रत देखील आढळल्याचे समजते.



बनावट पुराव्यांद्वारे बनली भारताची रहिवासी
आरोपीने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्ट तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. या बनावट भारतीय पासपोर्टच्या आधारे आरोपी महिला मे 2023 मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परतल्याची बाबही तपासात समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीस बनावट कागदपत्रे तयार करून देणारे संबंधित व्यक्ती, एजंट व दलाल यांचा शोध सुरू असून प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
बोटीद्वारे प्रवास : दलालांची साखळी
प्राथमिक चौकशीमध्ये आरोपी महिलेने 2009 मध्ये एका दलालास पाच हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला व त्यानंतर ती रेल्वेने भुसावळात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या कारवाईने शहरातील बेकायदेशीररित्या बांग्लादेशींचे वास्तव्य असल्याचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.






