नैराश्याविरुद्धची लढाई जिंकली ; दोन भावांच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडून यशस्वी उपचार


जळगाव (22 मे 2026) : मानसिक तणाव, एकटेपणा आणि नैराश्यामुळे जीवन संपवण्याच्या विचारांपर्यंत पोहोचलेल्या दोन सख्ख्या भावांना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या वेळेवर उपचारांमुळे नवजीवन मिळाले आहे. योग्य समुपदेशन, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सातत्यपूर्ण देखरेखीमुळे दोघांमध्ये सकारात्मक बदल घडून आला असून आता त्यांच्यात पुन्हा जीवन जगण्याची उमेद निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील मोठा भाऊ आनंदा (वय 34) गेल्या काही महिन्यांपासून गंभीर मानसिक तणावात होता. त्याला सतत कानात आवाज येत असल्याची भावना होत होती. आजूबाजूच्या लोकांबद्दल संशय निर्माण होणे, कोणीतरी आपल्याविरुद्ध कट रचत असल्याचा भास होणे, सतत निराश वाटणे आणि आत्महत्येचे विचार मनात येणे अशा गंभीर लक्षणांनी तो त्रस्त झाला होता. मानसिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असल्याने कुटुंबीयही चिंतेत होते.




दुसरीकडे, लहान भाऊ अजय (30) हा देखील नैराश्याच्या गर्तेत अडकला होता. सतत उदास राहणे, कोणाशीही संवाद न साधणे, एकटेपणा जाणवणे, जीवनाविषयी नकारात्मक विचार येणे आणि आत्महत्येचे विचार मनात येणे अशा अवस्थेत तो होता. दोन्ही भावांची मानसिक स्थिती चिंताजनक झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील मानसोपचार विभागाचे तज्ज्ञ डॉ.हुमेद महाडीक, डॉ.ऋचिता आटे, डॉ. देवांश गणात्रा या तज्ज्ञ डॉक्टरांनी दोघांची सखोल तपासणी करून उपचार सुरू केले. मोठ्या भाऊ आनंदा औषधोपचारांसोबत ईसीटी उपचार करण्यात आले, तर लहान भाऊ अजय याच्यावर औषधोपचार व समुपदेशनाद्वारे उपचार करण्यात आले.

सलग दहा दिवस डॉक्टर, समुपदेशक आणि प्रशिक्षित परिचारिकांच्या देखरेखीखाली दोघांवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी केवळ औषधोपचार न करता त्यांच्या मानसिक स्थितीचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्याशी नियमित संवाद साधत सकारात्मक विचार निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुटुंबीयांनाही योग्य मार्गदर्शन देण्यात आले. उपचारानंतर दोघांच्या मानसिक स्थितीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. आत्महत्येचे विचार कमी झाले असून नैराश्याची भावना दूर झाली आहे. आता दोघेही सामान्य जीवनाकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत.

तर रुग्ण पूर्णपणे होईल बरा
नैराश्य हा आजार लपवून ठेवण्यापेक्षा वेळेत उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. सतत उदास वाटणे, आत्महत्येचे विचार येणे, एकटेपणा जाणवणे किंवा संशय निर्माण होणे ही मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात. योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. कुटुंबीयांनीही मानसिक आजाराकडे दुर्लक्ष न करता रुग्णाला भावनिक आधार देणे गरजेचे असल्याचे डॉ.देवांश गणात्रा म्हणाले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !