राजपूत-परदेशी समाजातील गुणवंतांना ‘महाराणा प्रताप सन्मान पुरस्कार’साठी नावनोंदणीचे आवाहन
भडगाव (23 मे 2026) : राजपूत-परदेशी समाजातील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींनी राज्यस्तरीय “महाराणा प्रताप सन्मान पुरस्कार”ासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहन शिवराणा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा गौरव सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शिवराणा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अवघ्या चार दिवसांत शंभराहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींची नोंदणी झाली आहे. दरवर्षी या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे आयोजकांनी सांगितले.




परभणी, नाशिक, जळगाव, धरणगाव, अमरावती, खामगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त होत आहेत.
दहावी व बारावी परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करावी. तसेच एमपीएससी राज्यसेवा, यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन परीक्षा उत्तीर्ण उमेदवार, बीए, बीकॉम, बीएससी, एमबीबीएससह विविध पदवीधारक, स्पर्धा परीक्षा, क्रीडा क्षेत्रातील जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रमाणपत्रधारकांनीही आपली माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कुस्ती स्पर्धेत यश मिळविणारे खेळाडू तसेच सामाजिक क्षेत्रात दहा वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींनी पेपर कटिंगसह प्रस्ताव सादर करावेत. प्राप्त प्रस्तावांवर अंतिम निर्णय समितीमार्फत घेण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा व्यक्तींना “समाज भूषण पुरस्कार” देऊन गौरविण्यात येते. यासाठीही नावनोंदणी सुरू असून समाजातील गुणवंतांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी एल. डी. ताटू (अध्यक्ष), भोरासिंग राजपूत, आनंद बारवाल, अंजली कोकुल्डे, रंजितसिंग डेडवाल, प्रा. सुनिल शिहरे, धरमसिंग निमरोट, दिलीपसिंग राजपूत, सुनील राजपूत, कैलास जोनवाल आदी कार्यरत आहेत. संयोजक म्हणून एल. डी. ताटू हे काम पाहत आहेत. अशी माहिती भडगाव तालुक्याचे पत्रकार तथा राजपुत, परदेशी समाजाचे भडगाव तालुकाध्यक्ष अशोकबापु परदेशी यांनी दिली.







