रावेरात स्टेशन रोडवर मधमाशांच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी


रावेर (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : रावेर शहरातील स्टेशन रोड परिसरात शनिवारी दुपारी अचानक मधमाशांनी नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात पुंडलिक कोळी हे गंभीर जखमी झाले. गाढे वकील यांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

अचानक झाला हल्ला
रावेर शहरातील स्टेशन रोडवर शनिवारी दुपारी अचानक मधमाशांचा मोठा थवा नागरिकांच्या दिशेने आला. मधमाशांनी हल्ला केल्याने नागरिक व महिलांनी बचावासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. यावेळी रावेरहून गाते येथे जात असलेले पुंडलिक कोळी हे मधमाशांच्या तावडीत सापडल्याने गंभीर जखमी झाले तसेच रावेर शहरातील गाढे वकील यांनाही मधमाशांनी दंश केल्याने किरकोळ दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते बाळा आमोदकर, दुर्गेश पाटील, अनुज पाटील, जुगल अट्रावलकर आणि गोकुळ करोल यांनी तातडीने जखमींना रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार केले. पुंडलिक कोळी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर स्टेशन रोड परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मधमाशांचा हा थवा नेमका कुठून आला, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !