भुसावळात शिविगाळ केल्याच्या वादातून मित्राला संपवले
गणेश वाघ
भुसावळ (शनिवार, 26 सप्टेंबर 2026) : शहरातील रेल्वे कर्मचार्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच अवघ्या पंधरवड्यानंतर शहरात पुन्हा एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना श्री विसर्जनाच्या दिवशी अर्थात मंगळवार, 25 रोजी रात्री उशिरा घडल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. राहुल सदाशिव धांडे (35, कवठा, ता.अकोट, जि.अकोला) असे खून झालेल्या तरुणाचे तर पवन अनिल सोनवणे (30, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय घडले भुसावळात ?
सूत्रांच्या माहितीनुसार, संशयीत पवन व राहुल दोघे मित्र असून श्री विसर्जनाच्या दिवशी दोघेही शुक्रवारी सायंकाळपासून सोबत होते. रात्री दोघेही जुन्या नगरपालिकेतील विहिरीसमोरील एका खोलीत बसले असताना राहुलने पवनला अश्लील शिविगाळ केल्याने उभयंतांमध्ये वाद पेटला व संतापाच्या भरात आरोपी पवनने राहुलला जमिनीवर जोरात आपटले तसेच त्याचा रूमालाने गळा आवळून खून केला. खुनानंतर संशयीत पसार झाला.
वरणगाव पोलिसात आरोपी स्वतःहून शरण
मित्राच्या खुनानंतर अस्वस्थ झालेल्या पवनने रात्रीच वरणगाव गाठले मात्र अटकेची भीती त्याला सतावत असल्याने स्वतःहून तो वरणगाव पोलिसात हजर झाला व त्याने मित्र राहुलचा गळा आवळून व आपटून खून केल्याची कबुली वरणगाव पोलिसांकडे दिली. वरणगाव पोलिसांनी ही माहिती बाजारपेठ पोलिसांना शुक्रवारी सकाळी कळवताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.
पंधरवड्यात भुसावळात दुसरा खून
गुरुवार, 10 सप्टेंबर रोजी शहरातील पाटीलमळा भागात रेल्वे कर्मचारी तुषार गोविंद सोनवणे (36, श्रावस्ती नगर, भुसावळ) या तरुणाची महिलेशी असलेल्या संबंधाच्या वादातून चॉपरने वार कररून हत्या करण्यात आली होती. या घटनेत दोन अल्पवयींनासह एका आरोपीचा सहभाग आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेला 15 दिवस उलटत नाही तोच पुन्हा खुनाची घटना घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.