उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गुप्त दिल्ली दौरा : अमित शहांसोबत विधान परिषद निवडणुकांची चर्चा !


मुंबई (26 मे 2026) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

राजकीय भेटीची सर्वदूर चर्चा
राज्यात विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावरून महायुतीत हालचाली वेगाने सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त दिल्ली दौर्‍याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. यापूर्वी शिंदे यांची भेट झाली नव्हती तर शनिवारी रात्री अमित शहा यांच्या कार्यालयातून भेटीसाठी संदेश मिळाल्यानंतर शिंदे यांनी तातडीने खासगी विमानाने दिल्ली गाठली. विशेष म्हणजे या दौर्‍याची माहिती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली.

राजकीय घडामोडींवर चर्चा ?
दिल्लीतील या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे नाराज आणि अस्वस्थ असल्याची चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये शिंदे गटाची कोंडी होत असल्याची भावना त्यांच्या गटात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे पक्षविस्तार आणि स्वतःची ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ची रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भविष्यातील राजकीय दिशा, विधान परिषद निवडणूक आणि पक्ष विस्ताराच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या सर्व हालचालींबाबत भाजप आणि शिंदे गटाकडून मौन पाळण्यात आले आहे. त्यामुळे या भेटीमागील खरे कारण काय, याबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !