उकाड्यापासून मिळणार दिलासा : राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’


छत्रपती संभाजीनगर (27 मे 2026) : उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मराठवाड्यासह राज्यभरात बुधवार, 27 ते 29 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात दोन, मध्य महाराष्ट्रात तीन तर विदर्भात चार दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

हवामानशास्त्र विभागाचा ‘यलो अलर्ट’
छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात सोमवारी पूर्वमोसमी सरींनी हजेरी लावल्यानंतर बुधवार व गुरुवारीही सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पावसासंदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येणार्‍या दोन दिवसांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

पूर्वमोसमी पाऊस प्रामुख्याने सायंकाळीच पडण्याची कारणे

तीव्र तापमान : उन्हाळ्यात सकाळी 11 ते दुपारी 3 यादरम्यान जमीन प्रचंड तापल्याने स्थानिक पातळीवर तापमान खूप वाढते.

अभिसरण प्रक्रिया : तापलेली हवा हलकी होऊन वेगाने वातावरणात वरच्या दिशेने प्रवास करू लागते.

आर्द्रतेचा पुरवठा : वरच्या दिशेला जाणार्‍या या उष्ण हवेत समुद्राकडून येणार्‍या वार्‍यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प मिसळते.

वादळी ढगांची निर्मिती : दुपारपर्यंत बाष्पाचे सांद्रीभवन होऊन आकाशात उंच आणि उभ्या आकाराचे वादळी (क्युमुलोनिम्बस) ढग तयार होतात.

सायंकाळी पर्जन्यवृष्टी : ही प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपार उलटते. सायंकाळी तापमान थोडे कमी होताच मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !