यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय आरक्षण 12 जूनला निघणार


यावल (7 जून 2026) : यावल तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व 47 ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय आरक्षण 12 जूनला निघणा आहे. यावेळी विशेष सभा बोलावून प्रारूप आरक्षण काढण्यात येईल व त्यावर 25 जुनपर्यंत हरकती व सुचनेकरीता मुदत दिली जाणार आहे.

10 रोजी प्रसिद्धी
अंतिम वॉर्डनिहाय आरक्षणाला 10 जुलै रोजी प्रसिध्दी दिली जाणार आहे व त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार आहे. यावल तालुक्यातील मुदत संपत संपलेल्या 47 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहे. या सर्व 47 ग्रामपंचायतीच्या वॉर्डरचनेची कार्यवाही प्रशासनाने पुर्ण केली आहे. आता त्या-त्या ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय ग्रामपंचायत सदस्यांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहिर झाला आहे

यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी.एम.पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील त्या- त्या ग्रामपंचायतीत वॉर्डनिहाय आरक्षण काढण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. 12 जुन रोजी त्या-त्या ग्रामपंचायतीत विशेष सभा बोलावण्यात येईल व त्या-त्या वॉर्डातील विविध प्रवर्गातील लोकसंख्या लक्षात घेता आरक्षण काढले जाईल व या प्रारूप वॉर्डनिहाय आरक्षणास दिनांक 19 जुन रोजी प्रसिध्द केले जाईल.

दरम्यान या प्रारूप आरक्षणास जर कुणाची हरकत असेल तर हरकती व सुचने करीता 25 जुनपर्यंत हरकती व सुचना दाखल करता येतील. प्राप्त हरकतींवर निपटारा करून अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण 10 जुलै रोजी प्रसिध्द केले जाईल व त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

नागरीकांना उपस्थितीचे आवाहन
यावल तालुक्यातील वड्री खुर्द, कोसगाव, सांगवी खुर्द, पिळोदे खुर्द, हंबर्डी, राजोरे, कोरपावली, कासवे, शिरसाड, मनवेल, मारूळ, बामणोद, विरोदे, बोरावल खुर्द, किनगाव बुद्रुक, मोहराळे, डांभुर्णी, निमगाव, वनोली, दुसखेडे, अंजाळे, भालशिव, हिंगोणे, आमोदे, सातोद, विरावली, नायगाव,दहीगाव, भालोद, पिंप्री, उंटावद, वढोदे प्र.सावदा, कोळवद, महेलखेडी, चिंचोली, बोरखेडा बुद्रुक, सावखेडेसिम, पिंपरूड, टाकरखेडे, अट्रावल, डोंगरकठोरा, सांगवी बुद्रुक, डोणगाव, नावरे, वढोदे प्र.यावल, बोरावल बुद्रुक, आडगाव या गावात आरक्षण काढले जाणार आहे. नागरीकांनी ग्रामसभेत उपस्थित देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !