‘लाडक्या बहिणीं’ना मिळणार थकीत 6000 रुपये ? : अधिकृत घोषणेकडे लागले लक्ष


मुंबई (9 जून 2026)  लाडकी बहिण योजनेतील ज्या लाभार्थींना गेल्या चार महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही त्यांना थकीत रक्कम एकरकमी मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत घोषणेकडे लक्ष लागले आहे.

संभ्रम व नाराजीचे वातावरण
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना शासनाकडून दरमहा 1500 रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते मात्र आवश्यक ती ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी ते मे या सलग चार महिन्यांचे हप्ते अद्याप जमा झालेले नाहीत. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या या महिलांमध्ये संभ्रमाचे आणि काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता अशा सर्व महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक माहिती समोर येत आहे.

थकीत रक्कम एकत्रीत देण्याचा विचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे चार महिन्यांचे हप्ते प्रलंबित आहेत, त्यांना ही एकूण 6000 रुपयांची थकीत रक्कम देण्याबाबत सरकार स्तरावर विचार सुरू आहे. सदर रक्कम एकाच वेळी किंवा दोन टप्प्यांत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही पैसे न मिळाल्याने चिंतेत असलेल्या महिलांना या संभाव्य निर्णयामुळे मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.

‘दिव्यमराठी’ने पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार लाभार्थी महिलांची प्रलंबित रक्कम आता दोन टप्प्यांत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यांसाठी 3000 रुपये आणि एप्रिल व मे महिन्यांसाठी उर्वरित 3000 रुपये, अशा पद्धतीने एकूण 6000 रुपयांचे अनुदान दिले जाऊ शकते मात्र त्यासाठी शासनाच्या अधिकृत घोषणेची लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या संभाव्य निर्णयामुळे गेल्या चार महिन्यांपासून आपल्या थकीत हप्त्यांची प्रतीक्षा करणार्‍या महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !