खंडवा रेल्वे मार्गासाठी जमीन संपादनाला विरोध : पुर्नसर्वेक्षणाचे भुसावळातील बैठकीत निर्देश


Opposition to land acquisition for the Khandwa railway line: Directive for a re-survey issued at a meeting in Bhusawal भुसावळ (10 जून 2026) : खंडवा तिसर्‍या व चौथ्या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी प्रस्तावित 90 हेक्टर सुपीक जमीन संपादनाला फुलगाव परिसरातील शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता ‘ए प्लॅन’ तूर्तास स्थगित ठेवला व नवीन क्षेत्रातून स्वतंत्र जमीन संपादन करण्याऐवी विद्यमान रेल्वेमार्गाच्या लगतच विस्तार करण्याबाबत पुनर्सर्वेक्षण करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.

डीआरएम कार्यालयात आढावा बैठक
रेल्वे विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी डीआरएम कार्यालयात ही बैठक झाली. त्यात भुसावळ-खंडवा रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी फुलगाव, साखरी, फेकरी, जाडगाव, मनारखेडा, अंजनसोंडा, कठोरा खुर्द, कठोरा बुद्रुक आणि गहूखेडा परिसरातील सुमारे 90 हेक्टर सुपीक जमीन संपादित करण्याचे बैठकीत प्रस्तावित करण्यात आले होते मात्र या प्रस्तावाला शेतकरी प्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला. फुलगाव परिसरातील शेतकर्‍यांच्या जमिनी यापूर्वीही भुसावळ-नागपूर रेल्वेमार्ग, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव आणि बीटीपीएस दीपनगर प्रकल्पासाठी संपादित झाल्या आहेत त्यामुळे अन्यायकारक प्रस्ताव रद्द करण्याची मागणी शेतकर्‍यांनी लावून धरली. शेतकर्‍यांची बाजू आणि त्यांचा तीव्र असंतोष लक्षात घेता, नवीन क्षेत्रातून स्वतंत्र जमीन संपादन प्रक्रिया राबवण्याऐवजी रेल्वेच्या विद्यमान मार्गालगतच विस्तार करण्याबाबत पुनर्सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले.

प्रवासी सुविधा व प्रलंबित कामे
बैठकीत रोड अंडर ब्रिज (आरयूबी), रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) या कामांसह आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्या व प्रवासी सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

निकृष्ट कामांवर कारवाईची मागणी
दुसखेडा गेट, निंभोरा गेट तसेच झेडटीसी पुलाखाली सुरू असलेल्या काही रेल्वे कामांच्या गुणवत्तेबाबत बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. संबंधित ठिकाणी कंत्राटदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

रेल्वे भाडेकरू, दुकानदारांना दिलासा
भुसावळ शहरातील पालिकेच्या दवाखान्यासमोरील रेल्वे मालमत्तेवरील भाडेकरू आणि दुकानदारांच्या वाढीव भाड्याचा प्रश्न बैठकीत मांडण्यात आला. दुकानदारांच्या प्रतिनिधींनी कागदपत्रांसह आपल्या अडचणी मांडल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने तपासणीचे आश्वासन दिले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !