खडका जंक्शनवर जलनिस्सारण समस्या गंभीर ; सर्व्हिस रोड धोक्यात
घरगुती सांडपाणी साचल्याने तुंबल्या गटारी : पावसाळ्यात उपाययोजना गरजेच्या
भुसावळ (11 जून 2026) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील खडका जंक्शनवरील आरसीसी गटारीत सांडपाणी, घरगुती सांडपाणी व घनसाचरा साचल्याने गटारी तुंबल्या आहेत. यामुळे सर्व्हिस रोडचीदेखील हानी होत असून जलनिस्सारणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मूळातच आरसीसी नाल्याची उभारणी मुख्यतः राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी करण्यात आली असलीतरी आसपासच्या गावातून येणारे अतिरिक्त सांडपाणी व घनकचरा यामुळे नाल्याच्या वहनक्षमतेवर ताण निर्माण होत असून संपूर्ण जलनिस्सारण व्यवस्था प्रभावित झाली आहे.
नुकतीच झाली होती स्वच्छता
राष्ट्रीय महामार्गाच्या नियमित देखभाल कामांतर्गत 3 जून 2026 रोजी (चेनज 401+700 ते 402+200) या दरम्यान नाल्यांची साफसफाई व गाळ काढण्याचे काम करण्यात आले होते. तरीदेखील ही समस्या वारंवार उद्भवत असल्याने सातत्याने देखरेख आणि देखभालीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या संदर्भात गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत खडका, भुसावळ नगर परिषद तसेच जिल्हा परिषद जळगाव यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
तज्ज्ञांच्या मते, गावातील सांडपाण्यासाठी स्वतंत्र आणि शाश्वत निचरा व्यवस्था विकसीत करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे हा या समस्येवरील दीर्घकालीन उपाय ठरू शकतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत राहील, रस्ते वापरकर्त्यांना सुरक्षित व सोयीस्कर प्रवास करता येईल आणि सर्व्हिस रोडचे नुकसानही टाळता येईल.
स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. आगामी पावसाळ्यात जलभराव आणि रस्त्यांच्या नुकसानीपासून दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.


