तुकाराम मुंढे येणार असल्याची अफवा अन् किराणा, मिठाई दुकानांसह पानटपर्‍या, हॉटेल्स चालकांनी ठोकली धूम


बुलढाणा (15 जून 2026) : भ्रष्टाचारी यंत्रणेविरोधात सातत्याने कारवाई केल्याने चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे तपासणीसाठी येत असल्याची अफवा पसरली अन् शहरातील बाजारपेठ धडाधड बंद झाली.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या डोणगाव येथे सोशल मीडियावर ‘एफडीएचे साहेब येणार’ असा मेसेज फिरताच संपूर्ण बाजारपेठ काही मिनिटांत बंद झाली. किराणा, मिठाई दुकानांसह पानटपर्‍या आणि हॉटेल्स चालकांनी दुकाने बंद करून पळ काढला.



अनेक छोटे मोठे व्यावसायिक हॉटेल्स, पान टपरी, गुटखा व पान मसाल्याची दुकाने, एवढेच नाही तर अनेकांनी किराणा दुकाने, मिठाईची दुकाने बंद करून पोबारा करण्यातच धन्यता समजली. आता तुकाराम मुंढेंच्या आदेशाने अन्न आणि औषध प्रशासनाचा बडगा ग्रामीण भागातही उभारल्या जाऊ लागल्याने अनेक भागात भेसळ करणारे छोटे मोठे व्यावसायीक धास्तावले आहेत.

अवैध गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणार्‍या टपरी चालकांमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाची मोठी दहशत निर्माण झाली आहे. रविवारी परळीमध्ये एफडीएचं पथक कारवाई करणार असल्याची बातमी वार्‍यासारखी बीडमध्ये पसरली. त्यानंतर बीडमधील बहुतांश पानटपर्‍या चालकांनी कारवाई होण्यापूर्वीच आपल्या टपर्‍यांना कुलूप ठोकले.

राज्यात अवैध गुटखा आणि पानमसाल्याची विक्री रोखण्यासाठी आयुक्त मुंढे यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता गुटख्याचे उत्पादन करणार्‍यांपासून ते अगदी किरकोळ विक्री करणार्‍या टपरी चालकांपर्यंत सर्वांवर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या कठोर निर्णयामुळे माफियांचे धाबे दणाणले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !