मंत्री गिरीश महाजनांच्या व्हायरल फोटोंसोबत छेडछाड ; सायबर सेलचा अहवाल

व्हायरल चित्रांचे तांत्रिक विश्लेषण पूर्ण : सामाजिक व राजकीय प्रतिष्ठा कमी करण्यासाठी उपद्व्याप करण्यात आल्याचा दावा


Minister Girish Mahajan’s viral photos tampered with; Cyber ​​Cell report. मुंबई (22 जून 2026) : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो हे मूळ नसून त्यात मोठ्या प्रमाणावर फेरफार आणि छेडछाड करण्यात आल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात त्यांनी माध्यमांपुढे सायबर सेलचे तसेच खाजगी लॅबचा अहवालही दाखवला आहे. राज्याच्या सायबर सेलने या छायाचित्रांचे सखोल तांत्रिक विश्लेषण पूर्ण केले असून, हे फोटो बनावट असल्याचे अधिकृत प्रमाणपत्र जारी केले आहे. या सायबर अहवालामुळे गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे तर बदनामी करणार्‍यांवर आता कायदेशीर कारवाई होणार आहे.

काय म्हणाले मंत्री महाजन ?
नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी संबंधित फोटो खोटे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी काही मूळ फोटो दाखवत व्हायरल करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये डिजिटल छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला तसेच अशा प्रकारे खोटे फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात आपण सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहिती महाजन यांनी दिली. अशा प्रकारचे उद्योग करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणाच्याही प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी फोटो एडिट करून चुकीच्या पद्धतीने प्रसारित केले जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले.

महाजन यांनी पुढे सांगितले की, फोटोंमध्ये फेरफार करून कोणाच्याही नावाशी किंवा व्यक्तीशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही प्रकरणांमध्ये अश्लील आणि दिशाभूल करणारे फोटोही तयार केले जात असल्याने यावर तातडीने आळा घालण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

राजकीय प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबतचे काही फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्यात आले व त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती मात्र तपासात समोर आले आहे की, फोटोशॉप आणि अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गिरीश महाजन यांचा तरुण मुलीसोबतच्या फोटोंमध्ये छेडछाड करून ते मॉर्फ करण्यात आले होते. या प्रकरणी मंत्री महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल शरद पाटील यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी वेगाने पावले उचलल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

बदनामी करणार्‍यांवर होणार कारवाई
सायबर सेलच्या अहवालानंतर आता आरोपींचा शोध घेण्याचे काम पोलीस करत असून या सायबर अहवालामुळे गिरीश महाजन यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !