नाशिकमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराला भाजपा बंडखोराने चारली धूळ : राज्यात 16 जागांवर महायुतीचा दणदणीत विजय
BJP rebel trounces Shinde faction candidate in Nashik; Mahayuti secures resounding victory on 16 seats across the state नाशिक (22 जून 2026) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा सोमवारी सकाळी निकाल जाहीर करण्यात आला. त्यात नाशिक वगळता राज्यातील 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. नाशिममध्ये महायुतीतील शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना अपक्ष व भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीतेंनी धूळ चारली. नाशिकच्या निकालानंतर आता राज्यातील महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आले आहेत.
राज्यात 16 जागांवर महायुती विजयी
निवडणुकीआधीच 17 पैकी सहा ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे सोमवारी उर्वरीत 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला. नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते विजयी झाले. या निकालावरून आता महायुतीतील अंतर्गत कलह समोर आले आहेत.

नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात भाजपने 11, शिवसेनेने चार तर राष्ट्रवादीने दोन जागांवर निवडणूक लढवली होती.
राज्यात महायुतीचे वर्चस्व
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली. राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला. भाजप, 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे. दरम्यान, स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या पन्नास टक्के अधिक एक मत, असा ’विजयाचा कोटा’ निश्चित केला जातो. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत हा कोटा पूर्ण न झाल्यास, दुसर्या पसंतीची मते मोजली जातात.
असे आहे राज्यातील विजयी उमेदवार
1) ठाणे- रवींद्र फाटक (शिवसेना- बिनविरोध विजयी)
2) यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना- बिनविरोध विजयी)
3) रायगड- रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस- बिनविरोध विजयी)
4) पुणे- विक्रम काकडे (राष्ट्रवादी काँग्रेस- बिनविरोध विजयी)
5) वर्धा- गडचिरोली-चंद्रपूर- अरुण लखाणी (भाजप- बिनविरोध विजयी)
6) अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे (भाजप- बिनविरोध विजयी)
7) छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट (भाजप विजयी)
8) नाशिक- गोकुळ गीते अपक्ष (भाजप बंडखोर विजयी)
9) भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर (भाजप- विजयी)
10) सांगली-सातारा- धैर्यशील कदम (भाजप- विजयी)
11) परभणी-हिंगोली- सईद खान (शिवसेना- विजयी)
12) सोलापूर- राजेंद्र राऊत (भाजप- विजयी)
13) धाराशिव-लातूर-बीड (बसवराज पाटील- भाजप विजयी)
14) नागपूर- राजीव पोतदार (भाजप-विजयी)
15) जळगाव- नंदकिशोर महाजन (भाजप- विजयी)
16) अमरावती- प्रवीण पोटे (भाजप- विजयी)
17) नांदेड- अमर राजूरकर (भाजप- विजयी)

