भुसावळात ‘महेश नवमी’ मोठ्या उत्साहात साजरी
राधाकृष्ण प्रभात फेरीचा भक्तीमय समारोप
भुसावळ (23 जून 2026) : शहरातील राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे महेश नवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाजारपेठ पोलीस स्टेशनसमोरील महेश स्तंभाजवळ मंगळवार, 23 रोजी सकाळी प्रभात फेरीचा भक्तीमय वातावरणात समारोप झाला. याप्रसंगी प्रभात फेरीतील सर्व बंधू-भगिनींच्या उपस्थितीत भगवान श्री महेश (महादेव) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रभात फेरीचे प्रमुख संघटक राधेश्याम लाहोटी यांच्याहस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर अत्यंत उत्साहात महाआरती झाली.
शिवरायाच्या रूपातील नृत्याने वेधले लक्ष
महाआरतीनंतर सुभाष शिरसाळे यांनी भगवान शिवशंकराचा हुबेहूब पेहराव करून अप्रतिम नृत्य सादर केले. त्यांचा हा अवतार पाहून उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. संगीताच्या तालावर प्रभात फेरीतील सर्व भाविकांनीही ठेका धरत भक्तीनृत्य सादर केले. यासोबतच सादर झालेल्या भावगीतांमुळे संपूर्ण महेश स्तंभ परिसर शिवमय आणि धार्मिक वातावरणाने न्हाऊन निघाला होता. रस्त्यावरून जाणार्या अनेक पादचार्यांनी व नागरिकांनी थांबून या सोहळ्याचा आनंद घेतला आणि कार्यक्रमाचे कौतुक केले. प्रभात फेरीतील सदस्यांचा सत्कारयाप्रसंगी माहेश्वरी समाजातर्फे प्रभात फेरीतील सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला. संघटक राधेश्याम लाहोटी यांनी उपस्थितांना संबोधित करताना महेश नवमीचे धार्मिक व सामाजिक महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन जी.आर.ठाकूर तर आभार संजय अग्रवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व नागरिक आणि भाविकांना महाप्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली.


