मनसेच्या आंदोलन इशार्‍याला यश : भुसावळ बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम अखेर मार्गी

प्रशासनाने घेतली दखल : महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून आगार व्यवस्थापकांचे आभार


MNS protest threat yields results: Roadwork in the Bhusawal bus station area finally gets underway भुसावळ (25 जून 2026) : भुसावळ बसस्थानक परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आणि रखडलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या रस्ता रोको आंदोलनाच्या इशार्‍याची एस.टी.प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. भुसावळ विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी पठार यांच्याशी भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी फोनवर चर्चा केल्यानंतर डांबराची अडचण समोर आली मात्र कंत्राटदार धुळ्याहून डांबर आणून काम मार्गी लावेल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

मनसेने मानले आभार
आगार व्यवस्थापक शिवदे यांनी मनसेच्या पत्राला आणि प्रवाशांच्या मागणीला मान देत तत्काळ पावले उचलून हे काम मार्गी लावले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून मनसेतर्फे प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.



मनसेने दिला होता आंदोलन इशारा
भुसावळ बसस्थानकाच्या आवारात गेल्या काही महिन्यांपासून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. खड्डे आणि ओबड-धोबड रस्त्यांमुळे हजारो प्रवासी, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वप्रथम 1 एप्रिल 2026 रोजी आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी रस्त्यावर खडी टाकून काम सुरू केले मात्र ते काम अर्धवट सोडण्यात आले होते. डांबरीकरण प्रलंबित राहिल्याने धुळीचा त्रास अधिकच वाढला. त्यामुळे मनसेने पुन्हा 2 जून 2026 रोजी निवेदन दिले थेट बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता रोको आंदोलन’ करण्याचा जाहीर इशारा दिला होता.

प्रशासनाकडून तत्काळ दखल आणि काम पूर्ण
मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर भुसावळ विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि भुसावळ आगार व्यवस्थापकांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली केल्या. आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलत प्रलंबित असलेले डांबरीकरण व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करून मार्गी लावले.

मनसेतर्फे प्रशासनाचे मानले आभार
रस्त्याचे काम मार्गी लागल्यानंतर मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, सुशील मोरे, तालुका सचिव विलास कोळी, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रणय भागवत, दुर्गेश चोपडे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक भंगाळे यांनी समाधान व्यक्त केले आहे. लोकभावनेची व प्रवाशांच्या सुविधेची वेळेत दखल घेऊन काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी भुसावळ विभागातील संबंधित अधिकारी आणि आगार व्यवस्थापकांचे जाहीर आभार मानले आहेत. प्रशासनाने दाखवलेल्या या सकारात्मक तत्परतेचे सर्वसामान्य प्रवाशांकडूनही कौतुक होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !