भुसावळ पालिकेतील सभागृहातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करा : डॉ.नितु पाटील यांची मागणी
Live broadcast the proceedings of the Bhusawal Municipal Council meeting: Dr. Nitu Patil demands भुसावळ (25 जून 2026) : भुसावळकरांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात जावून नेमके काय काय करतात? जनहिताचे नेमके कोणते प्रश्न मांडतात? शहर विकासाची तळमळ लोकप्रतिनिधींना किती? हे शहरवासीयांना जाणून घेण्याचा अधिकार आहे. यानुषंगाने पालिकेतील सभागृह कामकाजाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण करावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी केली आहे.
शहरातही क्रांतीकारी पावले उचलण्याची गरज
भुसावळ नगरपरिषदेने सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपणाचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा व ज्याप्रमाणे भारताची संसद (लोकसभा व राज्यसभा) आणि राज्यांची विधिमंडळे (विधानसभा व विधानपरिषद) यांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करून लोकशाहीची दारे जनतेसाठी खुली केली आहेत त्याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आता अशाच क्रांतिकारी पावलांची गरज असल्याचे डॉ.पाटील कळवतात.


जनतेलाही कळू द्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जनतेविषयीचा कळवळा!
भुसावळ नगरपरिषदेने आपल्या सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सर्वसाधारण सभा, मासिक सभा आणि इतर महत्त्वाच्या बैठकांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्यास, हा देशातील आणि राज्यातील एक ऐतिहासिक व पथदर्शी निर्णय ठरेल. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सभागृहात काय काम करतात, शहराच्या विकासाचे प्रश्न कसे मांडतात, हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक भुसावळकर नागरिकाला आहे. थेट प्रक्षेपणामुळे नगरपरिषदेचा कारभार षकाचेसारखा स्वच्छ’ होईल आणि जनतेचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल.
शहराच्या बजेटवर आणि विकासकामांवर कोणत्या नगरसेवकांचा सखोल अभ्यास आहे. जनतेच्या पैशांचा योग्य विनियोग करण्यासाठी कोण प्रामाणिकपणे आवाज उठवत आहे. हे जनतेला घर बसल्या दिसेल.
विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभांमध्ये वैयक्तिक हेवेदावे, गोंधळ, आरडा-ओरड किंवा आक्रमक वर्तनामुळे मूळ विषय बाजूला पडतात. जेव्हा सभागृहातील प्रत्येक हालचाल कॅमेर्यात कैद होत आहे आणि ती थेट जनता पाहत आहे याची जाणीव लोकप्रतिनिधींना होईल, तेव्हा सभागृहाचे गांभीर्य आणि शिस्त राखली जाईल. यामुळे निरर्थक वादांवर वेळ वाया न जाता केवळ आणि केवळ जनहितार्थ चर्चा होईल.
तर भुसावळातील निर्णय ठरेल राज्यासाठी आदर्श
डिजिटल भुसावळ आणि आधुनिकतेकडे पाऊलआजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणणे अत्यंत सोपे झाले आहे. युट्युब, फेसबुक किंवा नगरपरिषदेच्या अधिकृत अॅप/वेबसाईटद्वारे हे लाईव्ह प्रक्षेपण अत्यंत कमी खर्चात सुरू करता येऊ शकते. यामुळे भुसावळ नगरपरिषद ही महाराष्ट्रातील एक ‘स्मार्ट आणि हायटेक नगरपरिषद’ म्हणून नावारूपास येईल. भुसावळच्या विकासासाठी, शहराच्या तिजोरीच्या योग्य वापरासाठी आणि लोकशाहीच्या मूल्यांचा आदर करण्यासाठी नगरपरिषद सभागृहाच्या बैठकांचे थेट प्रक्षेपण करणे ही काळाची गरज आहे. भुसावळ नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतल्यास, भुसावळ पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श पायंडा ठरेल, असा विश्वास डॉ.नितु पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भातील मागणी त्यांनी मंत्री संजय सावकारे व पालिका प्रशासनाकडे केली आहे.
