भुसावळातील मतदार याद्यांची होणार पडताळणी : घरोघरी बीएलओ देणार भेट
Voter lists in Bhusawal to undergo verification ; BLOs to visit homes भुसावळ (25 जून 2026) : भुसावळ तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक करण्यासाठी गुरुवार, 25 जून 2026 रोजी भुसावळ तालुक्यातील सर्व 316 बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) तसेच पर्यवेक्षक यांचे दोन सत्रांमध्ये ‘विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम’ अंतर्गत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात झाले. या मोहिमेद्वारे तालुक्यात मतदार याद्यांची विशेष पडताळणी केली जाणार आहे.
प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भरणार गणना पत्रक
या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सर्व 316 बीएलओ आता प्रत्यक्ष मतदारांच्या घरोघरी भेट देणार आहेत. तेथे प्रत्येक कुटुंबातील मतदारांची माहिती घेऊन ‘गणना पत्रक’ भरून घेतले जाईल. या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील त्रृटी दूर होण्यास मदत होईल.


2002 च्या मतदार यादीचा आधार ; पुरावे देणे बंधनकारक-
प्रशासनामार्फत या पडताळणीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मतदारांची किंवा त्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा यांची नावे सन 2002 च्या मतदार यादीत नोंदवलेली आढळणार नाहीत, अशा मतदारांना प्रशासनातर्फे विशेष नोटीस दिली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर संबंधित मतदारांना आपले नागरिकत्व व वास्तव्याबाबतचे आवश्यक ते कायदेशीर पुरावे प्रशासनाकडे सादर करावे लागणार आहेत. या प्रशिक्षणादरम्यान सर्व बीएलओ कर्मचार्यांना प्रत्यक्ष कामासाठी लागणारे ‘किट’ व ’गणना पत्रक’ यांचे वाटपही करण्यात आले.
वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती व मार्गदर्शन
या प्रशिक्षण शिबिरास भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बीएलओ कर्मचार्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले. तसेच याप्रसंगी निवडणूक शाखेचे अव्वल कारकून खतीब तडवी, लिपिक शाम गिरी, ऑपरेटर सचिन पाटील यांनी तांत्रिक व प्रशासकीय नियोजनात सहकार्य केले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
बीएलओ कर्मचार्यांना प्रत्यक्ष मैदानावर काम करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, गणना पत्रक कसे अचूक भरावे आणि नोटीस बजावण्याची कायदेशीर पद्धत काय असावी, याबाबत हिरानंद मूलचंदानी तसेच तेजेंद्र महाजन यांनी उपस्थित कर्मचार्यांना सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले.
निवडणूक प्रशासनाचे आवाहन
भुसावळ तालुक्यातील हा पुनरीक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा असून, सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणार्या बीएलओ अधिकार्यांना अचूक माहिती व योग्य ती कागदपत्रे देऊन राष्ट्रीय कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळ तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने केले आहे.
