भुसावळात पाण्यासाठी रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्राचार्यांना ‘रेल कामगार सेने’चा घेराव : टँकरने पाणी पुरवण्याचे आश्वासन


‘Rail Kamgar Sena’ gheraos Railway Training Institute Principal in Bhusawal over water supply; assurance given to supply water via tankers भुसावळ (25 जून 2026) : शहरातील रेल्वेच्या झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये (झेडआरटीआय) गेल्या अनेक दिवसांपासून प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना खासदार, केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत, सरचिटणीस दिवाकर देव व कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या आदेशाने ‘रेल कामगार सेने’च्या भुसावळ शिष्टमंडळाने आक्रमक पवित्रा घेतला. कार्यकर्त्यांनी झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य रामनिवास मीना यांची भेट घेऊन तत्काळ पाणी समस्या सोडवण्याची आग्रही मागणी केली.

पाण्यासह अस्वच्छतेबाबत विचारला जाब
रेल्वे प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या पाण्यासह अंघोळ आणि इतर दैनंदिन वापरासाठीही पाणी मिळत नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला होता. या पार्श्वभूमीवर रेल कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी प्राचार्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला. या घेराव आंदोलनादरम्यान केवळ पाणीच नव्हे, तर झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील जिमची काही प्रमाणात दुरावस्था आणि खानावळीतील (मेस) व होस्टेल मधील अस्वच्छतेच्या समस्येबाबतही प्राचार्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.



प्राचार्यांचे आश्वासन
आंदोलनाचा वाढता दबाव पाहून प्राचार्य रामनिवास मीना यांनी सकारात्मक भूमिका घेतली. जोपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत रेल्वेतर्फे प्रशिक्षणार्थींसाठी टँकरद्वारे पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले तसेच मेसमधील जेवण आणि स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली. या आंदोलनात रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा, प्रीतम टाक, अरविंद थोरात, तेजल पाटील, मुकेश महाजन, भरत शर्मा यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !