साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र पुन्हा वार्‍यावर : जखमी शेतमजुराला तासभर उपचाराची प्रतीक्षा


यावल (30 जून 2026) : यावल तालुक्यातील साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हाताला विळा लागून जखमी झालेल्या एका शेतमजुराला उपचारासाठी तब्बल एक तास प्रतीक्षा करावी लागल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल माळी हे शेतात काम करत असताना त्यांच्या हाताला विळा लागून दुखापत झाली. तातडीने उपचारासाठी ते साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले मात्र त्यावेळी डॉक्टर, नर्स किंवा इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष ठिकाणी केवळ एक कर्मचारी उपस्थित होता. तोदेखील जेवण करत असल्याने तातडीची वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असा दावा करण्यात आला आहे. गावातील काही पदाधिकार्‍यांना याची माहिती देण्यात आल्यानंतरही रुग्णाला जवळपास एक तास डॉक्टर व कर्मचार्‍यांची वाट पाहावी लागली, अशी माहिती समोर आली आहे.



दवाखान्यात आलो ही मोठी चूक
घटनेनंतर विशाल माळी यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले, सरकारी दवाखान्यात आलो हीच चूक झाली. खाजगी दवाखान्यात गेलो असतो तर तात्काळ उपचार मिळाले असते. ग्रामीण भागातील नागरिकांनी सरकारी आरोग्य व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कसा?

दरम्यान, या प्रकरणाबाबत भूमिका जाणून घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी राजू तडवी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोन स्वीकारला नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !