भुसावळात पाणी पेटले : वंचित बहुजन आघाडीचा 6 रोजी पालिकेवर ‘हंडा मोर्चा’

पत्रकार परिषदेत युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवारांचा इशारा ः चार वेळा मुदतवाढ देवूनही ‘अमृत’चे काम अपूर्णच


Water Issue Ignites Tensions in Bhusawal : Vanchit Bahujan Aghadi to Stage ‘Handa Morcha’ at Municipal Council on the 6th भुसावळ (1 जुलै 2026) : भुसावळात गेल्या अनेक वर्षांपासून पाणीप्रश्न प्रलंबित आहे. शहराजवळ असलेले हतनूर धरण व वाहणारी तापी नदी असतानाही शहरवासीयांना बारमाही पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत तर केंद्राची महत्त्वकांक्षी योजना अमृत मंजूर झाली व चारवेळा मुदतवाढ देवूनही ही योजना पूर्ण न झाल्याने ही स्थिती उद्भवल्याने याचा जाब विचारण्यासाठी भुसावळ पालिकेवर सोमवार, 6 रोजी ‘भव्य धिक्कार मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाण्यावर कोट्यवधींची उधळण
शासकीय विश्रामगृहात मंगळवारी पत्रपरिषदेत बाळा पवार म्हणाले की, शहरात दिवसेंदिवस पाणी प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. भुसावळ नगरपालिकेचे सत्ताधारी व प्रशासन मात्र हा प्रश्न सोडवण्याबाबत प्रचंड उदासीन दिसून येतात. पाणी समस्येवर कोट्यवधी रुपयांची उधळण करून सुद्धा पाणी प्रश्न तसाच आहे यातून केवळ मोठा भ्रष्टाचार पोसला गेला आहे. गेल्या 10 वर्षापासून भुसावळ शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची महत्वकांक्षी अमृत योजना मंजूर होऊन देखील निव्वळ नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाअभावी पूर्ण झालेली नाही. चार वेळा मुदतवाढ घेऊन सुद्धा पूर्ण योजना कोलमडली हे प्रशासनाचे अपयश आहे.



सत्तेसाठी नेत्यांचे भांडण मात्र पाणीप्रश्नाला बगल
बाळा पवार म्हणाले की, शहरात सत्तेसाठी भांडणारे राजकीय पक्ष व नेते पाणी प्रश्नाला बगल देत असून अमृत योजनेचे कारण देत वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. भुसावळकरांच्या आरोग्याशी खेळ चालला असून या संदर्भात जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार, 6 जुलै 2026 रोजी ‘ भव्य धिक्कार हंडा मोर्चा’चे आयोजन केले असल्याचे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळा पवार व महिला आघाडीच्या पल्लवी म्हणाल्या.

यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला वंचितचे युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महिला आघाडीच्या पल्लवी गुरचळ, जिल्हा संघटक बबन कांबळे, सुनीता पालवे, मीरा वानखेडे, प्रमिला बोदडे, अ‍ॅड.प्रवीण इंगळे, संगीत खरे, रुपेश साळुंके, दीपक सोनवणे, किशोर सोनवणे, नवनीत गायकवाड, प्रीती तायडे, निलोफर शेख, प्रवीण आखाडे, पवन रोकडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !