भुसावळचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास अधिकार्यांना काळे फासणार : रिपब्लिकन सेनेचा आंदोलनाचा इशारा
Officials to be smeared with black soot if Bhusawal’s water supply is not restored : Republican Sena threatens agitation भुसावळ (1 जुलै 2026) : भुसावळ पालिकेत प्रभारीराज सुरू असल्याने कुणाचाही पायपोस कुणातही राहिलेला नाही. शहरवासीयांना पाण्यासाठी यातना भोगाव्या लागत असताना पालिकेत अधिकारी शोधूनही सापडत नाही. शहराचा पाणीपुरवठा 48 तासांच्या आत सुरळीत करावा अन्यथा अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा रिपब्लिकन सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी दिला. प्रभारी मुख्याधिकारी पालिकेत नसल्याने त्यांच्या दालनाबाहेर यावेळी निवेदन डकवण्यात आले.
प्रभारीराजमुळे शहराचा विकास मंदावला
भुसावळ पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी उपस्थित राहत नसल्याने शहरवासी वार्यावर आहेत तर पाणीपुरवठा अधिकार्यांचे कार्यालय बंद असल्याने जनतेने जाब विचारावा कुणाला? असा प्रश्न सोनवणे यांनी केला. ते म्हणाले की, भुसावळकर जनतेने फक्त कर भरायचे आणि पाण्याच्या थेंबाथेंबासाठी मरायचे का? या प्रभारी राज्यामुळे भुसावळच्या जनतेची ससेहोलपट सुरू असून रिपब्लिकन सेना हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. पालिकेतील अधिकारी केवळ खुर्च्या उबवायला आणि जबाबदारी ढकलायला बसले आहेत का? प्रभारी असो की परमानंट आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. 48 तासांत जर भुसावळकरांच्या नळाला पाणी आले नाही, तर रिपब्लिकन सेना या प्रभारी मुख्याधिकार्यांच्या टेबलावर मडकी फोडो आंदोलन करणार असल्याचे व अधिकार्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचे यावेळी
विनोद सोनवणे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


