भुसावळ मतदारसंघात मतदार यादी पुनरिक्षणाला गती : प्रांताधिकारी जितेंद्र पाटील
81.38 टक्के मॅपिंग पूर्ण ; 13 हजार 890 दुबार नावे वगळली 30 जूनपासून घरभेटींचा टप्पा सुरू
Voter list revision gains momentum in Bhusawal constituency : Sub-Divisional Officer Jitendra Patil भुसावळ (1 जुलै 2026) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भुसावळ विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (एसआयआर 2026) मोहिमेला वेग आला आहे. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. प्रारंभीच्या टप्प्यात 20 जून ते 29 जूनदरम्यान पूर्वतयारी व कर्मचार्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर 30 जूनपासून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलीत करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती भुसावळ उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मॅपिंग कामाला वेग
प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भुसावळ मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येचा आढावा घेतला असता 1 जानेवारी 2026 रोजी मतदारसंख्या तीन लाख 18 हजार 834 इतकी होती. त्यानंतर स्थलांतरित, मयत तसेच दुबार नोंदी असलेल्या 34 हजार 770 मतदारांची नावे वगळण्यात आली. 22 जून 2026 रोजी एकूण मतदारसंख्या दोन लाख 84 हजार 64 इतकी नोंदविण्यात आली आहे. आतापर्यंत दोन लाख 31 हजार 176 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून हे प्रमाण 81.38 टक्के आहे. उर्वरित 52 हजार 888 मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी असून ते पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गती वाढवली आहे.


दुबार मतदारांवर विशेष लक्ष
या मोहिमेदरम्यान दुबार मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान 13,890 दुबार नावे आढळून आली असून ती यादीतून वगळण्यात आली आहेत. याशिवाय पाच हजार 255 मतदारांच्या छायाचित्रांमध्ये स्पष्टता नसल्याचे निदर्शनास आले होते. संबंधितांकडून फॉर्म क्रमांक 8 भरून घेऊन त्यांच्या रंगीत छायाचित्रांची अद्ययावत नोंद करण्यात आली आहे. एकूण 40 हजार 243 त्रृटी (अनॉमलीज) आढळून आल्या असून त्या टप्प्याटप्प्याने दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.
बीएलओ घरोघरी जाणार : 3 ऑक्टोबर रोजी यादी जाहीर होणार
पुढील टप्प्यात 30 जून ते 29 जुलै या कालावधीत बीएलओ घरोघरी जाऊन गणना प्रपत्र भरून घेणार आहेत. प्रत्येक बीएलओकडून दररोज सरासरी 50 अर्ज भरण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. एखादा मतदार घरात उपलब्ध नसल्यास, घर बंद असल्यास किंवा स्थलांतरित झाल्यास त्याची स्वतंत्र नोंद ठेवून पंचनामा केला जाणार आहे. या प्रक्रियेनंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी दिली जाईल. अंतिम मतदार यादी 3 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मोहिमेसाठी व्यापक नियोजन
प्रशासनाने या मोहिमेसाठी व्यापक नियोजन केले असून प्रत्येक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकार्यांकडे 40 ते 50 यादी भाग सोपविण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीसाठी 4 ते 5 पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचारी आणि सुमारे 10 ऑपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून एका केंद्रात 1200 पेक्षा अधिक मतदार राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. या कामासाठी 14 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 30 नोडल अधिकारी आणि 316 बीएलओ कार्यरत असून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच गाव पातळीवरील पोलीस पाटील यांचे सहकार्य घेतले जात आहे. मतदार यादी शुद्ध व अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले. घरोघरी येणार्या बीएलओ बांधवांना नागरिकांनी अचूक माहिती देऊन मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी उपस्थित होते.
