केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या प्रयत्नातून भुसावळहून पंढरपूरसाठी विशेष आषाढी रेल्वे

वारकर्‍यांना मोफत प्रवासाची सुविधा : लाभ घेण्याचे आवाहन


भुसावळ (2 जुलै 2026) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी यंदाही भुसावळ रेल्वे स्थानकावरून विशेष अनारक्षित आषाढी रेल्वे चालविण्यात येणार आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकारातून ही विशेष रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

24 रोजी भुसावळातून धावणार रेल्वे
विशेष रेल्वेचे नियोजन जळगाव, बुलढाणा तसेच परिसरातील वारकरी व भाविकांना लक्षात घेऊन करण्यात आले आहे. विशेष रेल्वे शुक्रवार, 24 जुलै 2026 रोजी दुपारी दिड वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना होईल तसेच शनिवार, 25 जुलै 2026 रोजी रात्री 10.30 वाजता पंढरपूरहून भुसावळकडे परतीचा प्रवास करेल.



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दरवर्षीप्रमाणे भुसावळ-पंढरपूर विशेष आषाढी रेल्वे चालविण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने या विशेष रेल्वेस मंजुरी दिली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ही अनारक्षित विशेष आषाढी रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या स्वखर्चातून चालविण्यात येणार असून, वारकरी व भाविकांना पूर्णपणे मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊन मोठ्या संख्येने वारकरी व भाविकांनी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !