ग्रामपंचायत आरक्षणावरील 36 हरकतींवर प्रांताधिकार्यांसमोर सुनावणी 8 जुलैपर्यंत अहवाल जिल्हाधिकार्यांकडे
भुसावळ, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षणावर नागरिकांनी मांडली भूमिका निर्णयाची उत्सुकता
भुसावळ (5 जुलै 2026) : भुसावळ, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर गुरुवार, 2 जुलैला भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी पार पडली. सकाळी 11 वाजता सुरू झालेली सुनावणी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी हरकतदारांनी आपली बाजू मांडली. प्रांताधिकार्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.
भुसावळ तालुक्यातील कु-हे प्र.न. (दोन जागा), कठोरे बु. (दोन जागा), आचेगाव, बेलव्हाळ (दोन जागा), कंडारी (तीन जागा), खडका (तीन जागा), पिंप्रीसेकम आणि मन्यारखेडा अशा एकूण 15 हरकतींवर सुनावणी घेण्यात आली.

17 हरकतींवर सुनावणी
मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणे, नांदवेल, सुकळी, पंचाणे, मेळसांगवे, पिंप्रीपंचम, लोहारखेडे, निमखेडी बु., चिंचोल, जोंधनखेडा, घोडसगाव (दोन जागा), नरवेल (दोन जागा), माळेगाव, पारंबी आणि संपूर्ण ग्रामपंचायत आरक्षणाबाबत अशा एकूण 17 हरकतींवर सुनावणी झाली.
बोदवड तालुक्यातील मनूर बुद्रुक, हिंगणे, जामठी आणि नाडगाव या चार ग्रामपंचायतींच्या हरकतींवरही प्रांताधिकार्यांनी सुनावणी घेतली.
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या सुनावणीनंतर तयार होणारा अहवाल 8 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आरक्षणाबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
यावेळी नायब तहसीलदार शोभा घुले उपस्थित होत्या. सुनावणीदरम्यान उपस्थित हरकतदारांना त्यांचा निर्णय शुक्रवारपर्यंत कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षण प्रक्रियेतील या सुनावणीला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून, अंतिम निर्णयाकडे संबंधित ग्रामपंचायतींसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
