भुसावळ पालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा भव्य धिक्कार हंडा मोर्चा

नगराध्यक्षांनी प्राशन केले गढूळ पाणी : अमृत योजनेच्या भ्रष्टाचारावर मोर्चेकर्‍यांनी ठेवले बोट


Vanchit Bahujan Aghadi’s massive protest march against the Bhusawal Municipal Council, featuring water pots as a symbol of protest भुसावळ (6 जुलै 2026) : भुसावळ शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाई व दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये सत्ताधारी व पालिका प्रशासनाविषयी तीव्र चीड निर्माण झाली आहे. शहराजवळ असलेले धरण व वाहणारी तापी नदी असतानाही पावसाळ्यात जनता हंडाभर पाण्याला तरसली आहे. या पार्श्वभूमीवर भुसावळात वंचित बहुजन आघाडीतर्फे सोमवार, 6 रोजी भुसावळ नगरपालिकेवर भव्य धिक्कार हंडा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहरातील शेकडो महिला व नागरिक सहभागी झाले. मोर्चेकर्‍यांनी पाणीप्रश्नांवरून सत्ताधारी व प्रशासनाला जाब विचारला.

नगराध्यक्षांनी पिले गढूळ पाणी
मोर्चा नगरपालिकेत धडकल्यावर नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकारी व नगराध्यक्ष यांना मोर्चेकर्यांनी प्रश्नांचा भडीमार करून तीव्र संताप व्यक्त केला. भुसावळ शहरातील पाणीपुरवठा नियमित आणि स्वच्छ पाण्याचा करावा, अशी मागणी यावेळी प्रामुख्याने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांना पुरवठा होत असलेल्या गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले. मोर्चाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने उपमुख्य अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता व सत्ताधारी नगरसेवक यांनी लवकरच नियमित व स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वस्त केले. यावेळी मोर्चा करांनी अमृत योजनेच्या कोट्यवधी रुपयाच्या भ्रष्टाचाराबाबत देखील प्रश्न निर्माण करून नगराध्यक्षांना धारेवर धरले.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, पल्लवी गुरचळ यांनी केले. याप्रसंगी वंचितचे जिल्हा संघटक बबन कांबळे, उपाध्यक्ष राहुल इंगळे, मीरा वानखेडे, संगीत खरे, रुपेश साळुंके, दीपक सोनवणे, अ‍ॅड.प्रवीण इंगळे, नवनीत गायकवाड, रोहित सोनवणे, विलास तायडे, प्रवीण जमदाडे, दिनेश नरवाडे, सिद्धार्थ साळवे, विनोद तिमोती, विजय साळुंखे, पिंटू इंगळे, प्रतीक आव्हाड, जॉन्टी धीवरे, रवींद्र अहिरे, गणेश इंगळे यांच्यासह शेकडो नागरिक महिला उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !