भुसावळ पालिका उभारणार छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा ! भाजपा नगरसेविका डॉ.छाया फालक (देशमुख) यांच्या पाठपुराव्याला यश


भुसावळ (10 जुलै 2026) : विधानपरिषद निवडणुकीमुळे रखडलेली पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवार, 16 जुलै रोजी होत आहे. गायत्री भंगाळे जात प्रमाणपत्रानंतर अपात्र झाल्यानंतर भाजपा प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडेंच्या उपस्थितीत होणार्‍या या सभेत अनेक महत्त्वाचे विषय अजेंड्यावर आहेत. त्यात भुसावळ बाजारपेठ ठाण्याजवळील नियोजित जागेवर छत्रपती संभाजीराजे शिवाजीराव भोसले यांचा पुतळा होणार आहे. भुसावळ भाजपाच्या नगरसेविका डॉ.छाया फालक (देशमुख) यांनी या संदर्भात पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, शहरातील उड्डाणपुलांना महापुरूषांची नावे देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी केली आहे.

छत्रपती राजे उत्तम साहित्यीकही
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे हे छत्रपती संभाजी राजे हे उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.

विषयाला मंजुरी मिळण्याची शिवप्रेमींची अपेक्षा
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनजवळ नियोजित जागेवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी मागणी डॉ.देशमुख यांनी केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली आहे. पालिकेच्या अजेंडा क्रमांक 64 वर हा विषय घेण्यात आला आहे. हा विषय म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांप्रती असलेल्या आदराची आणि नागरिकांच्या भावनांचा सन्मान करणारी असल्याने या विषयावर सकारात्मक निर्णय होण्याची शिवप्रेमींना अपेक्षा आहे.

उड्डाणपुलांना मिळणार महापुरूषांची नावे
शहरातील नाहाटा चौफुलीवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुल, नवोदय विद्यालयाजवळील पुलाला सरदार वल्लभभाई पटेल उड्डाणपुल तर खडका चौफुलीवरील उड्डाणपुलाला डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुल तर सुहास हॉटेलजवळील उड्डाणपुलाला महाराणा प्रताप उड्डाणपुल नाव देण्याची मागणी भाजपा नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !