चाळीसगाव नगरपरिषदेसाठी दोन अग्निशमन वाहन खरेदीसाठी एक कोटी 80 लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी
चाळीसगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागासाठी पडणार उपयोगी, सुरक्षित चाळीसगावच्या दिशेने दमदार पाउल : आमदार मंगेशदादा चव्हाण व नगराध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
चाळीसगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : चाळीसगाव नगरपरिषदेसाठी दोन अग्निशमन वाहन खरेदीसाठी एक कोटी 80 लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी दिली आहे. चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण व नगराध्यक्षा प्रतिभाताई चव्हाण यांचा पाठपुरावा यासाठी मोलाचा ठरला आहे.
नागरिकांना मिळाला दिलासा
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या पाच लाखांवर आहे. चाळीसगाव शहरासह छोट्या मोठ्या 140 खेड्यांचा विस्तार आहे. इतका मोठ्या तालुक्यात आग विझवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून केवळ एकमेव 25 वर्ष जुनी अग्निशमनची गाडी चाळीसगाव नगरपालिकेकडे असून तीदेखील शेवटची घटका मोजत होती, शहरात आग विझवण्यासाठी अग्निशमनची गाडी जात असताना रस्त्यातच बंद पडल्याचे प्रकार देखील घडले होते. आग लागल्यास मालेगाव, भडगाव येथून अग्निशमन वाहन मागवावे लागत होते. त्याची दखल घेत 2 वर्षांपूर्वी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी एक मिनी अग्निशमन रेस्क्यू वाहन चाळीसगाव नगरपरिषदेकडे दाखल झाले होते तर दोन महिन्यांपूर्वी अजून एक मिनी रेस्क्यू वाहनाची भर पडल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला होता.


मात्र सदर रेस्क्यू वाहने छोटी असल्याने शहरातील निमुळत्या गल्ल्यांसाठी, अडचणीच्या ठिकाणांची आग विझविण्यासाठी तसेच आगीच्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी, जखमींना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यासाठी त्यांचा खास उपयोग होतो. चाळीसगाव तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोठेही मोठ्या स्वरुपाची आग लागल्यास मोठी अग्निशमन वाहने देखील नगरपरिषदकडे असणे गरजेचे होते त्यामुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे चाळीसगाव नगरपरिषदेला 2 अत्याधुनिक अग्निशमन वाहने घेण्यासाठी एक कोटी 80 लाख रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय 15 जुलै रोजी निघाला आहे. लवकरच चाळीसगाववासीयांच्या सुरक्षिततेसाठी ही दोन नवी कोरी अग्निशमन वाहने दाखल होणार आहेत.
अग्निशमन यंत्रणा होणार बळकट
चाळीसगाव शहराची अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम होणार असून जुनी 2 मिनी अग्निशमन रेस्क्यू वाहन, 2 फायर बुलेट दुचाकी यांच्या जोडीला नवीन 2 मोठी अग्निशमन वाहने दाखल होतील. एकाचवेळी 2 / 3 ठिकाणी आगीच्या घटना घडल्यास तातडीने त्या आटोक्यात आणण्यासाठी चाळीसगावची अग्निशमन यंत्रणा आता सज्ज असणार आहे. चाळीसगाव नगरपरिषदेच्या अग्निशमन वाहनांसाठी भरघोस निधीची तरतूद केल्याबद्दल नगराध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसम जलसंपदामंत्री गिरीशभाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण व व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.