जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये ‘न्यूज पेपर’वर मिळताय खाद्यपदार्थ : अन्नसुरक्षा नियमांचा भंग !
भुसावळातील प्रमोद पाटील यांची तक्रार ः कारवाईकडे लागले लक्ष
जळगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये वडा-पाव, कचोरी तसेच इतर तेलकट खाद्यपदार्थ थेट वृत्तपत्राच्या (न्यूज पेपर) कागदावर देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत याबाबत जिल्हाधिकार्यांकडे भुसावळचे प्रमोद पाटील लेखी तक्रार केली आहे. या प्रकारामुळे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
काय आहे तक्रारदाराचा दावा
भुसावळचे तक्रारदार प्रमोद जगन्नाथ पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने छापील वृत्तपत्र किंवा मुद्रित कागदावर खाद्यपदार्थ देऊ नयेत, असे वेळोवेळी स्पष्ट निर्देश दिले आहेत. छपाईसाठी वापरल्या जाणार्या शाईतील रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळून आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारास मनाई करण्यात आली आहे.


मात्र, शासनाच्या महत्त्वाच्या कार्यालयाच्या परिसरातच या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी कार्यालयातच अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारदारांनी जिल्हाधिकार्यांकडे संबंधित कॅन्टीनची तत्काळ तपासणी करून वृत्तपत्रावर खाद्यपदार्थ देण्याची प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार किंवा जबाबदार व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करावी, भविष्यात अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना द्याव्यात आणि या तक्रारीवर झालेल्या कारवाईची माहिती लेखी अथवा ई-मेलद्वारे कळवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या तक्रारीवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.