भुसावळातील तापी माईला 108 मीटर साडी अर्पण : जन्मोत्सव उत्साहात

मासिक महाआरती, स्वच्छता व वृक्षारोपणाचा संकल्प


भुसावळ (सोमवार, 20 जुलै 2026) : सूर्यकन्या माता तापी नदीच्या जन्मोत्सवानिमित्त भुसावळात रविवारी विविध धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांनी नटलेला भव्य सोहळा उत्साहात पार पडला. तापी नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करत भाविकांनी माता तापीला 108 मीटर लांबीची साडी श्रद्धाभावाने अर्पण केली. महाआरती, पूजन, भजन, कीर्तन, शोभायात्रा तसेच वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांमुळे परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. विशेष म्हणजे या सोहळ्यात मोठ्या संख्येने बालकांनी सहभाग नोंदविल्याने कार्यक्रमाला वेगळेच चैतन्य लाभले.

तापी माईचे विधीवत पूजन
कार्यक्रमाची सुरुवात तापी नदीच्या विधिवत पूजनाने झाली. मंगेश जोशी यांनी पौराहित्य करत धार्मिक विधी संपन्न केले. त्यानंतर उपस्थित भाविकांनी एकत्रितपणे तापीची महाआरती केली. कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. नदी संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केली.

भाविकांनी केले संकल्प
जन्मोत्सवानिमित्त उपस्थित भाविकांनी महत्त्वपूर्ण संकल्पही केले. दर महिन्याच्या पौर्णिमेला सायंकाळी 6 वाजता तापी मंदिर घाट व महादेव मंदिर परिसरात नियमित तापी महाआरती आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच तापी नदी व परिसर कायम स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष ‘तापी घाट’ विकसित करून श्रमदानातून स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

108 मीटर साडी गरजूंना वाटप
कार्यक्रमातील आणखी एक सामाजिक उपक्रम विशेष आकर्षण ठरला. माता तापीला अर्पण करण्यात आलेली 108 मीटर साडी गरीब व गरजू महिलांना मोफत वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली. धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम उपस्थितांनी स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, डॉ.रेखा पाटील, प्रभू स्वामी, ह.भ.प. प्रल्हाद ढाके महाराज, नर्मदा व तापी परिक्रमावासी प्रकाश धांडे महाराज, माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी, प्रकाश जयस्वाल, शिशिर जावळे, वसंत पाटील (नाशिक), आशिष तिवारी, मंगला पाटील, स्वाती भोळे, प्रभाताई पाटील, प्रा. डॉ. भाग्यश्री भंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, सूर्यकन्या तापी नदीच्या जन्मदिनानिमित्त हतनूर धरण येथेही तापी नदीचे विधिवत पूजन करण्यात आले. या माध्यमातून नदी संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुषार जयस्वाल, महेश पाटील, कैलासिंह चव्हाण, जयप्रकाश शुक्ला, प्रगती पाटील, नेहा देगलूरकर, वैशाली बराटे, दिलीप टाक, आर. के. कोळी, देवेंद्र वराडे, दिलीप खंडेलवाल, शैलजा पाटील, हितेंद्र कोलते, विनय बेंडाळे, किरण पाटील, सतीश पाटील, विशाल बोरोले, सचिन नेवे यांच्यासह सूर्यकन्या ताप्ती भक्त परिवार, साई निर्मल फाउंडेशन, तिवारी फाउंडेशन, सकल लेवा महिला मंडळ, संत सेवा मंडळ, देवानगर मंडळ, इस्कॉन भुसावळ, सुंदरकांड आस्था परिवार, भुसावळ तालुका ज्येष्ठ नागरिक संघ, राधाकृष्ण प्रभात फेरी परिवार, जळगाव महिला भजनी मंडळ, खानदेश आई ग्रुप तसेच विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !