भुसावळात 50 फुटी भव्य तिरंग्याची रॅली : कारगिल वीरांना अभिवादन
मंत्री संजय सावकारे यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग ; देशभक्तीच्या घोषणांनी शहर दुमदुमले
भुसावळ (रविवार, 26 जुलै 2026) : कारगिल विजय दिनानिमित्त भुसावळ शहरातील बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या वतीने शनिवार, 26 जुलै रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.
मंत्री संजय सावकारे यांनी दाखवली हिरवी झेंडी
कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून बाजारपेठ पोलीस ठाण्यापासून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, उपाध्यक्ष विनोद बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मनीष बियाणी, नगरसेवक युवराज लोणारी, पिंटू कोठारी, पिंटू ठाकूर, पुरुषोत्तम नारखेडे, रुपेश देशमुख, सीमा नरवाडे, प्रशांत नरवाडे, प्रीती पाटील, बबलू बर्हाटे, परीक्षित बर्हाटे, संदीप सुरवाडे तसेच बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या विविध संस्थांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
शहीद राकेश शिंदे स्मारकावर अभिवादन
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून कारगिल युद्धातील वीर जवानांना अभिवादन केले. बियाणी मिलिटरी स्कूलचे सुमारे 500 विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून कारगिल विजय दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
तिरंगा रॅलीवर पुष्पवृष्टी
रॅली साई जीवन मॉल परिसरात पोहोचताच नगरसेवक पिंटू कोठारी व त्यांच्या सहकार्यांनी विद्यार्थ्यांवर व तिरंगा रॅलीवर पुष्पवृष्टी करून उत्साहात भर घातली.
50 फुटांचा तिरंगा ठरला आकर्षण
‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणांनी संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 50 फुटांचा विशाल तिरंगा हातात घेत शिस्तबद्ध रॅली काढत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. मार्गभर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी बाजारपेठ पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सहकार्य केले.



