यावल शहरात होणार छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा : शहर विकासाच्या 29 विषयांना पालिका सभेत मंजुरी
प्रलंबित चतुर्थ वार्षिक फेर कर आकारणीकरीता जिल्हाधिकार्यांचे मार्गदर्शन घेणार : मुख्याधिकारी सभेला येत नसल्याच्या माहितीवरून काही वेळ वातावरण तापले
Grand Statue of Chhatrapati Shivaji Maharaj to be Erected in Yaval City; 29 City Development Proposals Approved at Municipal Council Meeting यावल (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : यावल नगरपरिषदेच्या सभागृहात 29 विषयांकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. या सभेत प्रारंभी मुख्याधिकारी अनुपस्थित राहणार असल्याचे कळताच सत्ताधारी व विरोधक एकवटले आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने मुख्याधिकारी यांना सभेत यावे लागले. सभेतच त्यांच्याविरुद्ध सत्ताधार्यांसह विरोधकांनी एकत्रीत नाराजी व्यक्त करीत त्यांना खडेबोल सुनावले. या सभेत यावल शहरात भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या विषयाला मंजुरी मिळाली. प्रलंबित चतुर्थ वार्षिक फेर कर आकारणी करिता जिल्हाधिकार्यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय झाला आहे तर शहरातील विकास कामांच्या विविध विषयाला सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली आहे.

पालिकेची विशेष सभा
यावल पालिकेत मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. सकाळी अकरा वाजता नगराध्यक्ष छायाताई पाटील, उपनगराध्यक्ष सईदाबी मो.याकूब, भाजपा गटनेता नंदाताई महाजन, नगरसेवक अतुल पाटील, राकेश कोलते आदी कार्यालयात हजर झाले होते मात्र मुख्याधिकारी या सभेला येणार नाही, असे कळताच सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी यांना सभेसाठी यावे लागले व सभा ही अर्धा तास उशिराने सुरू झाली. दरम्यान सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांनी मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली व त्यांना सभागृहात खडेबोल सुनावले, तुम्हाला विचारूनच सभा ठरवली आणि तरीदेखील आपण जर उपस्थित होत नसाल तर उपयोग काय ? असे सभेतच त्यांना सुनावण्यात आले.
यावल शहरात शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा होणार
पालिका सभेमध्ये शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या विषयाला सर्वांमध्ये मंजुरी देण्यात आली. यात नगरसेवक अतुल पाटील यांनी सत्ताधारी व विरोधक गटातील नगरसेवकांना पुतळा उभारण्यासाठी आपण आपल्या स्तरावर जागा सुचवावी सर्वानुमते आपण एकाच जागेची निवड करून तेथे पुतळा उभारू असे सांगितले.
काम न करताच कंपनीला 28 लाख अदा
त्याचप्रमाणे शहरातील प्रलंबित असलेली चतुर्थ वार्षिक फेर कर आकारणीबाबत विचार विनिमय करण्यात आला, यात प्रशासकीय काळामध्ये चतुर्थ वार्षिक फेर कर आकारणी करीता कंत्राटदार कंपनी नेमली होती. त्या कंपनीला काम केले नाही तरी ही 28 लाखाचे देयक अदा करण्यात आले. तेव्हा संबंधित मक्तेदारावर काय कारवाई केली आणि काम न करता त्याला पैसे दिलेचं कसे ?, ज्या तत्कालीन अधिकारी, कर्मचार्यांनी पैसे दिले त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल ? असा प्रश्न भाजपाचे नगरसेवक राकेश कोलते व उबाठाचे नगरसेवक अतुल पाटील यांनी उपस्थित केला. या संदर्भात आपण जिल्हाधिकारी कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊ, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अन्य विकासाच्या विषयांना मंजुरी
शहरातील इतर विकासकामांचे जे विषय होते ते सर्वांमध्ये या बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीचे कामकाज नगराध्यक्ष छायाताई पाटील, उपनगराध्यक्ष सईदाबी मो.याकूब, मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्या उपस्थितीत पार पडले. 29 विषय हे सर्वांमध्ये मंजूर करण्यात आले.