जनसमाधान बैठकीतील 40 अर्जांचा आठ दिवसांत निपटारा करा : भुसावळात जिल्हाधिकार्यांचे विभागप्रमुखांना कडक निर्देश
भुसावळ उपविभागातील जनसमाधान उपक्रमाचा आढावा : महसूल, पंचायत समिती, नगरपरिषद, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकामसह विविध विभागांच्या अधिकार्यांची उपस्थिती
भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार, 6 रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळ उपविभागातील जनसमाधान उपक्रमांतर्गत आढावा बैठक झाली. या बैठकीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी व अर्जांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांशी संबंधित एकूण 40 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत समोर आली. या अर्जांची गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्यांनी सर्व विभागप्रमुखांना प्रलंबित प्रकरणांचा पुढील आठ दिवसांच्या आत नियमानुसार निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
तातडीने अर्जांचा निपटारा करण्याचे आदेश
बैठकीदरम्यान जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, प्राप्त सर्व अर्जांवर तातडीने आणि नियमबद्ध पद्धतीने कार्यवाही करून संबंधित प्रश्न मार्गी लावावेत. ज्या प्रकरणांमध्ये तांत्रिक अथवा धोरणात्मक अडचणी असतील, त्या प्रकरणांमध्ये विलंब न करता वरिष्ठ अधिकार्यांचे मार्गदर्शन घेऊन आवश्यक प्रस्ताव सादर करून कार्यवाही पूर्ण करावी. तसेच नागरिकांच्या अर्जांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले.
याशिवाय, करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित अर्जदारांना स्वतःहून कळविण्यात यावी तसेच प्रत्येक विभागाने कार्यवाहीचा सविस्तर अहवाल एकत्रीत स्वरूपात जिल्हाधिकार्यांकडे सादर करावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे, मुक्ताईनगर उपअधीक्षक नंदराज पाटील, मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे, बोदवड तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या विभागांचे अधिकारी उपस्थिती
या जनसमाधान आढावा बैठकीस महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींचा वेळेत निपटारा करून प्रशासन अधिक उत्तरदायी व गतिमान करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
