वायर, कृषी मोटार अन् सोलर पॅनेल चोरांवर जळगाव पोलिसांचा ‘स्पेशल वॉच’!
जळगाव जिल्ह्यात 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान विशेष मोहीम ; शेजारील जिल्हे अन् मध्य प्रदेशातील पोलिसांशी समन्वय
जळगाव (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : कृषी पंप, तांब्याची वायर, महावितरणच्या वायर तसेच सोलर पॅनेल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी आता विशेष कृती आराखडा राबविला आहे. 28, 29 व 30 सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर विशेष मोहीम राबवून चोरट्यांच्या टोळ्यांसह चोरीचा माल खरेदी-विक्री करणार्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे.
या कारवाईसाठी धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक ग्रामीण, जालना तसेच मध्य प्रदेशातील खरगोन, बुर्हाणपूर आणि बडवानी जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधण्यात आला आहे. जळगावचे पोलिस अधीक्षक यांनी संबंधित जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांशी थेट संपर्क साधून आवश्यक प्रतिबंधात्मक व तपासात्मक कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत.
या मोहिमेत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचे हॉटस्पॉट निश्चित करून चोरीची वेळ, पद्धत, वापरलेली वाहने, वायरचा प्रकार, चोरीचा मार्ग आणि मालाची विल्हेवाट यांचे विश्लेषण केले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख भंगार व्यावसायिकांची माहिती संकलित करून संशयास्पद व्यवहार आणि मोठ्या प्रमाणातील तांबे खरेदी-विक्रीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
संवेदनशील भागातील सीसीटीव्ही व डिजिटल पुराव्यांचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित व्यक्ती व वाहनांचा माग काढण्यासह वायर, कृषी मोटार व सोलर पॅनेल चोरीतील सराईत आरोपींचा स्वतंत्र डेटाबेस तयार केला जात आहे. सोलर प्रकल्प व्यवस्थापनाशी समन्वय साधून सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही आणि रात्रीच्या वेळी सर्च लाईटसह सुरक्षा वाहनांची गस्त वाढविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, गावपातळीवर पोलीस पाटील आणि ग्राम सुरक्षा दलालाही अधिक सक्रिय करण्यात येणार असून संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने पोलिसांना देण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. विहिरी, तलाव, कालवे, नदीकाठ आणि पाणी स्रोतांजवळील शेतांमध्ये रात्रीची नियमित तसेच अचानक गस्त वाढविण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कळवले आहे.
