जादूटोण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक : मांत्रिक महिलेसह पाच संशयीत धुळे शहर पोलिसांच्या जाळ्यात
धुळे (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : जादूटोणा व अघोरी पूजेच्या नावाखाली नाशिक येथे एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धुळे शहर पोलिसांनी मांत्रिक महिलेसह तिच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. संशयितांनी भिंतीवर जादूटोण्याचे साहित्य व चिन्हे निर्माण करून भीती दाखवत तब्बल एक लाख 60 हजार रुपये उकळल्याचे पोलिसांनी सांगितले.
असे आहे फसवणूक प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अरुणा पद्माकर पारखे यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी नाशिक येथील सरिता मनोज जाधव हिची ओळख करून दिली. सरिता जाधव हिने फिर्यादीला तिच्यावर काही बाधा असल्याचे सांगून ती नाशिक येथे जाऊन निवारण करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी सुमारे एक लाख 51 हजार रुपये खर्च येईल, असे सांगण्यात आले. यानंतर फिर्यादीची मुलगी पियुषिता हिला अरुणा पारखे व चारुशीला पारखे यांनी नाशिक येथील गणेश मनोज जाधव याच्याशी लग्न करून देण्याचे सांगितले. पुढे फिर्यादीच्या मुलीचा गणेश जाधव याच्याशी संपर्क साधून त्यांचा साखरपुडेही करण्यात आले मात्र साखरपुडा झाल्यानंतर मुलीसोबत भेटणे बंद करण्यात आले.
जादूटोणा केल्याचा आरोप
अमावस्येच्या दिवशी फिर्यादीला नाशिक येथील गंगाघाट परिसरात अघोरी स्नानासाठी नेण्यात आले. त्यानंतर नाशिकच्या लेन्सकार्डसमोर असलेल्या घरी नेऊन तेथे जादूटोणा केल्याचा आरोप आहे. आरोपींनी भिंतीवर जादूटोण्याचे चिन्ह निर्माण करून फिर्यादीकडून एक लाख 60 हजार रुपये रोख घेतले तसेच फिर्यादीच्या मुलीवरही जादूटोणा करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंधश्रद्धेला बळी पडू नका : पोलिसांचे आवाहन
जादूटोणा, अघोरी उपाय किंवा तथाकथित मांत्रिकांच्या माध्यमातून भीती निर्माण करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. अशा प्रकारच्या प्रकरणांची माहिती नागरिकांनी तातडीने पोलिसांना द्यावी. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
पाचही आरोपींना धुळे पोलिसांकडून अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने अरुणा पद्माकर पारखे, चारुशीला पद्माकर पारखे (दोन्ही रा.भावसार गल्ली, जमनागिरी रोड, धुळे), मांत्रिक महिला सरिता मनोज जाधव, गणेश मनोज जाधव व मनोज जाधव (तिन्ही रा.मुंबई नाका, लेन्सकार्डच्या समोर, नाशिक) यांना अटक केली आहे.
