गरजू विद्यार्थिनींना मोफत शालेय गणवेशांचे वाटप : चाळीसगावातील राष्ट्रीय कन्याशाळेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
चाळीसगाव (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : शहरातील राष्ट्रीय कन्या शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठानच्या वतीने गरजू विद्यार्थिनींना मोफत शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. समाजाभिमुख उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या चेहर्यावर आनंद फुलला. स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यांची विचार मंचावर उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रा. स. शिक्षण प्रसारक मंडळ, चाळीसगावचे चेअरमन डॉ. बापूसाहेब विनायकराव यशवंतराव चव्हाण होते. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षिका नूतन पाटील यांनी ईशस्तवन, तर भैरवी सोनवणे यांनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रतिष्ठानचे सचिव तथा उपशिक्षक सतीश पाटील यांनी प्रास्ताविकात लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत यांच्या कार्याचा व जीवनप्रवासाचा आढावा घेतला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना मोफत शालेय गणवेशांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार मंगेश रमेश चव्हाण, संस्थेचे सहसचिव रावसाहेब जयवंतराव साळुंखे, संचालक भाऊसाहेब महारू पाटील, सोनुसिंग प्रतापसिंग ठाकरे, अॅड.साहेबराव चव्हाण, नगरसेविका विजयाताई पवार, नगरसेवक धर्मराज बच्छे, प्राचार्य वाय.आर.सोनवणे, राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद अमृतकार, राष्ट्रीय कन्याशाळेच्या प्राचार्या अनिता पाटील, उपप्राचार्य रविंद्र जगतसिंग पाटील, पर्यवेक्षक धर्मराज बिरारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्रसिंग राजपूत, हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुचित्राताई पाटील, अतुल पाटील, आबासाहेब पाटील, कर्मचारी प्रतिनिधी उज्वला पाटील व हरिष महाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
निंबा पवार यांनी आपल्या भाषणातून लोकनायक तात्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. प्राचार्या अनिता पाटील यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थिनींसाठी शाळेत डोम उभारण्याची मागणी आमदारांकडे केली.
प्रमुख पाहुणे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रतिष्ठानच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक करत संस्थेला आवश्यक त्या सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष डॉ.बापूसाहेब विनायकराव चव्हाण यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करून संस्थेच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्चना वाबळे तर आभार उपशिक्षिका भैरवी सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रतिष्ठानचे पदाधिकारी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
