भुसावळात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा 13 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा


भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : भुसावळ शहरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक ठरलेल्या श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचा 13 वा वर्धापनदिन गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गेली 13 वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या या प्रभात फेरीने आता 14 व्या वर्षात पदार्पण केले आहे.

दररोज पहाटे 6.15 ते 6.30 या वेळेत शहरातील विविध वॉर्ड व गल्लीबोळातून निघणार्‍या या प्रभात फेरीत सुमारे 80 ते 100 भाविक सहभागी होतात. सहभागी नागरिक भगवान श्री राधाकृष्ण यांच्या नामस्मरणासह भजने, भक्तिगीते आणि हरिनामाचा गजर करीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून टाकतात. ही प्रभात फेरी हिंदू समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि धार्मिक संस्कारांचे प्रभावी उदाहरण मानली जाते.



वर्धापन दिनानिमित्त पहाटे पुरातन श्रीराम मंदिरात विशेष भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर भगवान श्रीराम व श्रीराधाकृष्ण यांची महाआरती करून उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांनी प्रभात फेरीच्या गेल्या 13 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत तिची स्थापना, उद्दिष्टे आणि सामाजिक-धार्मिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंडित जगदीश शर्मा, जे. बी. कोटेचा, प्रा.जे.पी.सुचिक, संत शरण गुप्ता आणि सुनील लाहोटी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संजय अग्रवाल यांनी केले.

धार्मिक श्रद्धा, समाजातील एकात्मता आणि संस्कार जपण्याचे कार्य सातत्याने करणार्‍या श्री राधाकृष्ण प्रभात फेरीच्या 14 व्या वर्षाच्या प्रारंभाबद्दल उपस्थित भाविकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !