राज्यसेवा निकालानंतर 40 अधिकाऱ्यांना पदस्थापना : बोदवडला तबस्सुम सैय्यद, वरणगावला राहुल भोये मुख्याधिकारी

नगर विकास विभागाचा आदेश जारी; राज्यसेवा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या 40 परिविक्षाधीन मुख्याधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर


गणेश वाघ
Maharashtra Chief Officer Transfers 2026 भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : राज्यसेवेच्या अंतीम निकालाद्वारे परिविक्षाधीन कार्यक्रम 11 अंतर्गत मुख्याधिकारी गट व गट ब संवर्गातील 40 परिवेक्षाधीन मुख्याधिकार्‍यांच्या नियुक्त्या राज्य शासनाचे नगर विकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी छापवाले यांनी केल्या आहेत. त्यात गट अ संवर्गातील सात तर गट ब संवर्गातील 33 अधिकार्‍यांचा समावेश आहे. बोदवड व वरणगाव पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी लाभले असून अधिकार्‍यांच्या नियुक्तीमुळे पालिका कामकाजाला आता गती येणार आहे.

वरणगाव मुख्याधिकारीपदी राहुल भोये
वरणगाव मुख्याधिकारी म्हणून राहुल मनोहर भोये यांची नियुक्ती राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून कायम मुख्याधिकारी नसल्याने वरणगावचा विकास खोळंबला होता. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे यांना भेटून विनंती केली होती. राज्य सरकारने शुक्रवार, 7 रोजी रात्री उशिरा काढलेल्या ऑर्डरनुसार वरणगावसाठी राहुल मनोहर भोये यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.



बोदवड पालिकेत तबस्सुम सैय्यद यांची नियुक्ती
बोदवड पालिकेत गट ब संवर्गातून तबस्सुम सैय्यद यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भुसावळला मुख्याधिकार्‍यांची प्रतीक्षा
नाशिक विभागातील एकमेव अ वर्ग पालिका भुसावळला अद्यापही पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने त्याचा परिणाम दैनंदीन सोयी-सुविधांवर झाला आहे. भुसावळसाठी देखील पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा, अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, गट अ व ब संवर्गातील अधिकार्‍यांच्या नियुक्त्या या ऑक्टोबर 2026 वा पुढील आदेश येईपर्यंत असणार असल्याचे आदेशात नमूद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !